आरोपीला अटक करण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर चाकुहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:14 IST2021-09-26T04:14:24+5:302021-09-26T04:14:24+5:30
तिवसा : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेंदूरजना बाजार येथील पुतणीने आपल्या ४० वर्षीय काकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी पोलीस ठाण्यात ...

आरोपीला अटक करण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर चाकुहल्ला
तिवसा : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेंदूरजना बाजार येथील पुतणीने आपल्या ४० वर्षीय काकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या अनुषंगाने बीट जमादार हे आरोपीला ठाण्यात आणण्यासाठी गेले असता, त्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला करीत जखमी केले. स्वत:देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली.
पोलीस सूत्रांनुसार, प्रशांत श्रीरंग देवळे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, तिचा हा काका सतत शिवीगाळ, कुठल्याही कारणावरून भांडण करतो. महिलेने प्रशांतविरुद्ध तक्रार दाखल केली. बीट जमादार विनायक गावंडे हे त्याच्या घरी गेले असता, त्याने चाकूने हल्ला चढविला. गावंडे यांच्या उजव्या हाताला चाकू लागल्याने ते जखमी झाले. यानंतर प्रशांत देवळे याने आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास तिवसा पोलीस निरीक्षक रीता उईके या करीत आहेत.