मेळघाटात थोरल्याने केली लहान भावाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST2021-05-07T04:13:20+5:302021-05-07T04:13:20+5:30
चिखलदरा : तालुक्यातील दहेंद्री येथे शेतीच्या वादातून थोरल्या भावाने लहान भावाच्या डोक्यावर लाकडी पाट मारून गंभीर जखमी केले. जिल्हा ...

मेळघाटात थोरल्याने केली लहान भावाची हत्या
चिखलदरा : तालुक्यातील दहेंद्री येथे शेतीच्या वादातून थोरल्या भावाने लहान भावाच्या डोक्यावर लाकडी पाट मारून गंभीर जखमी केले. जिल्हा रुग्णालयात त्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. बुधवारी रात्री ही घटना घडली. सुरेश रामा येवले (३२) असे मृताचे नाव असून आरोपी मोठा भाऊ राजेश रामा येवले याला पोलिसांनी अटक केली.
मृताची पत्नी अंकिता हिच्या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध भादंविच्या ३०२ कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील दहेंद्री येथील सुरेश पुण्याला खासगी कंपनीत नोकरीला होता. लॉकडाऊनमुळे तो गावी आला. वडिलांनी बांधलेल्या नवीन घरात राहत होता. बुधवारी रात्री तो झोपला होता. तेथे मोठा भाऊ राजेश पोहोचला. अनेक दिवसांपासून शेतीच्या हिस्से वाटणीवरून दोघांमध्ये वाद सुरू आहे. त्याचा राग मनात ठेवून त्याने घराचे दार बंद करून झोपलेल्या भावाच्या डोक्यावर लाकडी पाट मारून त्याला गंभीर जखमी केले.
सुरेश याला जखमी अवस्थेत नजीकच्या चुरणी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती खालावल्याने जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
बॉक्स
लॉकडाउनने घेतला जीव
सुरेश पुण्यात मुलाबाळांसह तिथे राहत होता. मात्र, लॉकडाऊन व कोरोनापासून वाचण्यासाठी तो गावी आला होता. अशातच मोठ्या भावाने शेतीच्या हिस्से वाटणीवरून वाद करीत त्याला यमसदनी पाठविले. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनात सपोनि शहाजी रुपनर जमादार, गजानन भारती, ईश्वर जांबेकर, सुरेश राठोड, पवन, रुपेश केंद्रे, मनोज खडके अधिक तपास करीत आहे.