हातपाय बांधून परिचित तरुणाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 06:00 IST2019-09-21T06:00:00+5:302019-09-21T06:00:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अनैतिक संबध प्रस्थापित करण्यासाठी आलेल्या एका परिचित तरुणाची हातपाय बांधून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक ...

हातपाय बांधून परिचित तरुणाची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अनैतिक संबध प्रस्थापित करण्यासाठी आलेल्या एका परिचित तरुणाची हातपाय बांधून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी महादेवखोरी स्थित न्यू प्रिया कॉलनीत उघडकीस आली. प्रमोद नामदेव लोणारे (२५ रा. धामणगाव देव, ता. दारव्हा, जि. यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. या हत्याप्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी अनिल भगवान धनद्रव्ये (३२ रा. न्यू प्रिया कॉलनी), त्याची पत्नी दीपमाला व साडू अमोल वरघट (रा. महादेव खोरी) यांना अटक केली आहे.
मूळचा धामणगाव देव येथील रहिवासी अनिल धनद्रव्ये हा सेंट्रिंगचे काम करतो, तर त्याची पत्नी दीपमाला टेलरिंगचे काम करते. एकाच गावाचे असल्याने प्रमोद त्यांच्या घरी येत होता. मात्र, त्याची दीपमालावर नजर होती. ही बाब लक्षात आल्यानंतर दोघांनीही प्रमोदला समजावले. मात्र, त्याचे वर्तन हे संशयास्पदच होते.
गुरुवारी रात्री प्रमोद मद्यधुंद अवस्थेत अनिलच्या घरी पोहोचला. त्याने दीपमालाशी असभ्य वर्तणूक केली. हा प्रकार पाहून अनिलचा राग अनावर झाला. प्रमोदनेही अनिलला शिवीगाळ केली. त्यामुळे रागाच्या भरात अनिलने प्रमोदच्या डोक्यावर लोखंडी सलाखीने वार करून त्याला मारहाण केली. त्यामुळे प्रमोद निपचित पडला. मात्र, तो रात्री केव्हाही भानावर आल्यानंतर आपल्यावर हल्ला करेल, या भीतीपोटी अनिलने प्रमोदचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत खुर्चीला बांधून ठेवले. त्यानंतर धनद्रव्य दाम्पत्य झोपी गेले. सकाळी उठताच त्यांनी प्रमोदची पाहणी केली. तोपर्यंत तो मरण पावला होता. अनिलनेच फ्रेजरपुरा पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
ठाणेदार पंजाबराव वंजारी यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी अनिल व त्याची पत्नी दीपमाला यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर हत्येचा उलगडा झाला. या प्रकरणात मृताचे वडील नामदेव शंकर लोणारे (६०,रा. धामणगाव देव) यांनी सायंकाळी फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी धनद्रव्ये दाम्पत्य व अमोल वरघट अशा तिघांविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३४३, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.