उमर, कन्हैयालालला फाशी द्या
By Admin | Updated: February 25, 2016 00:03 IST2016-02-25T00:03:00+5:302016-02-25T00:03:00+5:30
‘कश्मीर हो या गुवाहाटी..अपना देश अपनी माटी.., देश के सम्मान में..हम सब मैदान में,’ अशा घोषणा देत वीर केसरी ....

उमर, कन्हैयालालला फाशी द्या
दमदार नारेबाजी : वीर केसरी युवा प्रतिष्ठानच्या भारत एकता गौरव मार्चला प्रतिसाद
अमरावती : ‘कश्मीर हो या गुवाहाटी..अपना देश अपनी माटी.., देश के सम्मान में..हम सब मैदान में,’ अशा घोषणा देत वीर केसरी युवा प्रतिष्ठानद्वारे बुधवारी काढण्यात आलेल्या भारत एकता गौरव मार्चने जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला. उमर-कन्हय्याला फाशी देण्याची जोेरदार मागणी मोर्चेकऱ्यांनी यावेळी केली. पोलिसांनी कडेकोड बंदोबस्त ठेवला होता.
दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) ९ फेब्रुवारी रोजी घडलेल्या देशद्रोह प्रकरणाविरोधात हा मार्च काढण्यात आला होता. यात शेकडोे कार्यकर्ते, भाजप पदाधिकारी, महिलांचा सहभाग होता. मोर्चेकऱ्यांनी पाकिस्तान विरोधी जोरदार नारेबाजी करुन देशद्रोही कारवाया करणाऱ्या उमर व कन्हय्याला फाशी देण्याची मागणी केली. कलेक्ट्रेट परिसरात या मार्चमुळे देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
वीर केसरी युवा प्रतिष्ठानचे संयोजक बादल कुळकर्णी यांनी मोर्चाचे नेतृत्त्व केले. स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकातून मोर्चाला सुरूवात झाली. तिरंगा हाती घेऊन युवकांनी ‘भारत माता की जय’ अशा गगनभेदी घोषणा दिल्यात. या मार्चमध्ये युवकांचा लक्षणीय सहभाग होता. देशद्रोेही कारवायांमुळे प्रकाशात आलेली जेएनयू ही विद्यार्थी संघटना व ‘एयआयएसएस’ या देशद्रोही विद्यार्थी संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी युवकांनी रेटून धरली. देशविरोधी कृत्य करणे म्हणजे देशाच्या एकता, अखंडतेला बाधा पोहचविणे असल्यामुळे अशा कारवाया करणाऱ्यांना फाशीच झालीच पाहिजे, अशी एकच मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. मार्चमध्ये सहभागी युवकांचा आक्रोश आणि देशभक्तीचा जल्लोष बघून पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बल, आरसीपी प्लॅटून बोलाविले होते. घटनास्थळी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके देखील पोहोचले होते. ‘जेएनयू’मध्ये झालेल्या देशद्रोही कृत्याचा विरोध करीत सर्वप्रकारच्या अभ्यासक्रमातील पुस्तकाच्या पहिल्या पानावर भारत मातेचे छायाचित्र अंकित करावे, या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांना देण्यात आले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जयंत डेहनकर, वीर केसरी युवा मार्चचे संयोजक बादल कुळकर्णी, कुणाल टिकले, आकाश वाघमारे, प्रणित सोनी, रितेश मुंधडा, दत्ता अंबोडे, भूषण हरकुट, अखिलेश राजपूत, निखील भटकर, सूरज जोशी, प्रितम ठाकूर, शंतनू भारतीय, अभिषेक दरांगे, प्रवीण मिश्रा, राज नागतोडे, विक्रम चांडक, आदर्श गोरे, रोहीत काळे, आदी उपस्थित होते.