खत्री कॉम्प्लेक्सप्रकरणी खुलासा मागविणार
By Admin | Updated: September 22, 2015 00:15 IST2015-09-22T00:15:17+5:302015-09-22T00:15:17+5:30
तहसीलनजीक बीओटी तत्त्वावर साकारलेल्या खत्री कॉम्प्लेक्समध्ये गाळेधारकांसोबत झालेल्या...

खत्री कॉम्प्लेक्सप्रकरणी खुलासा मागविणार
मसुदा तयार : गाळे धारकांना बजावणार नोटीस
अमरावती : तहसीलनजीक बीओटी तत्त्वावर साकारलेल्या खत्री कॉम्प्लेक्समध्ये गाळेधारकांसोबत झालेल्या नियमबाह्य करारनाम्याप्रकरणी महापालिका खुलासा मागविणार आहे. या खुलाशाचा मसुदा तयार करण्यात आला असून गाळेधारकांना नोटीस बजावली जाणार आहे.
खत्री कॉम्प्लेक्स हे बीओटी तत्त्वावर साकारण्यात आले आहे. हा करारनामा सन २०२० मध्ये संपुष्टात येणार अ़ाहे. परंतु महापालिका बाजार व परवाना विभागाचे तत्कालीन अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी फ्रेबुवारी २०१५ मध्ये ३३ गाळेधारकांना नव्याने २०१४ पर्यंत करारनामे करुन दिले आहेत. हे करारनामे नियमबाह्य असून यात जयस्वाल, कंत्राटदार खत्री यांनी बदमाशी केल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत स्पष्ट झाले आहे. खत्री कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या अपहारप्रकरणी फौजदारी दाखल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पोलिसांत धाव घेतली. मात्र, यात गाळेधारकांवर फौजदारी करणे अशक्य असल्याचे मत पोलिसांनी पत्राद्वारे महापालिकेला कळविले आहे. उपायुक्त चंदन पाटील हे स्वत: शहर कोतवाली ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचले होते. एकूण ३३ जणांविरुद्ध तक्रार देत फौजदारी दाखल करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला होता. परंतु ज्या गाळेधारकांसोबत २०४० सालापर्यंत करारनामे करुन दिलेत त्यांचे करारनामे संपुष्टात येण्यास आणखी ५ वर्षे शिल्लक असल्याचे पोलिसांना कागदपत्रांवरुन दिसून आले. त्यामुळे ही फसवणूक महापालिकेची नव्हे तर गाळेधारकांची झाली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
खत्री कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत कोणाचाही मुलाहिजा केला जाणार नाही. यात दोषींवर सरसकट फौजदारी कारवाई करण्याची प्रशासनाची तयारी होती. मात्र, ही बाब तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. तरी देखील यातील बारकावे तपासण्यासाठी गाळे धारकांचे खुलासे मागविले जात आहेत.
-चंदन पाटील
उपायुक्त, महापालिका.