खरिपाची पैसेवारी ४६ पैसे

By Admin | Updated: November 15, 2014 22:36 IST2014-11-15T22:36:49+5:302014-11-15T22:36:49+5:30

जिल्ह्यात २०१४-१५ या खरीप वर्षाकरिता पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार १५ नोव्हेंबरला निश्चित केली. ही पैसेवारी ४६ पैसे म्हणजे पन्नास पैशांच्या आत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील

Kharipachi paiswari 46 paise | खरिपाची पैसेवारी ४६ पैसे

खरिपाची पैसेवारी ४६ पैसे

जिल्हा दुष्काळाच्या छायेत : शेतकऱ्यांना मदत, सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा
गजानन मोहोड - अमरावती
जिल्ह्यात २०१४-१५ या खरीप वर्षाकरिता पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार १५ नोव्हेंबरला निश्चित केली. ही पैसेवारी ४६ पैसे म्हणजे पन्नास पैशांच्या आत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून सोयी-सवलतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
१४ तहसीलदारांकडून आलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी ३० सप्टेंबरला नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली. ती ६० पैशांच्या आसपास होती. त्यानंतर सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली.
सुधारित पैसेवारी निश्चित
लागवडीयोग्य असणाऱ्या १,९८१ गावातील नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक होती. वास्तविक यावर्षी दीड महिना उशिरा पाऊस, निकृष्ट बियाणे, पावसात खंड, दुबार पेरणी यामुळे मूग व उडीद बाद झाले. सोयाबीन पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरिपाचे पीक हातून गेले, रबीसाठी जमिनीत आर्द्रता नाही, शेतकरी आर्थिक संकटात असताना नजर अंदाज आकडेवारी ५० टक्क्यांवर आल्याने शेतकरी संभ्रमात होता. मात्र प्रत्यक्ष पीक कापणीच्या आधारे, खरीप पिकांच्या सुधारित पैसेवारीचे अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार जिल्ह्यातील १४ तहसीलदारांकडून प्राप्त अहवालाच्या आधारे खरीप पिकाची सुधारित पैसेवारी निश्चित करण्यात आली. त्यानुसार अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, वरुड, अचलपूर, चांदूरबाजार, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा व धारणी या १४ ही तालुक्यांमधील लागवडीयोग्य ११८१ गावांमधील खरीप पिकांची सुधारित आणेवारी ५० पैशांच्या आत म्हणजे ४६ पैसे निश्चित करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मदत, सवलती मिळण्याचा मार्ग खुला आहे.
अशी आहे नजरअंदाज पैसेवारी
पिकांची प्रत्यक्ष नजरेने पाहणी करुन प्रथम नजरअंदाज पैसेवारी काढण्यात येते. यासाठी सर्व प्रकाराच्या जमिनीवरील पिकांच्या पाहणीसाठी प्रत्येक गावात प्रमुख पिकांचे १२ भूखंड निवडले जातात. या पैसेवारीनंतर कोणत्याही कारणाने पिकाच्या उत्पादन स्थितीत बदल झाल्यास सुधारित पैसेवारी काढण्यात येते. यावर्षी ही पैसेवारी ४६ पैसे आहे.
शेतकऱ्यांना मिळणार मदत, सवलत
पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासकीय मदत व सवलतींचा लाभ दिला जातो. त्या अनुशंगाने जिल्ह्यातील खरिप पिकाची सुधारीत पैसेवारी ४६ पैसे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी मदत व सवलतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: Kharipachi paiswari 46 paise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.