खरिपाचे ठरले नियोजन, ७.२८ लाख हेक्टर क्षेत्र
By Admin | Updated: June 9, 2017 00:09 IST2017-06-09T00:09:25+5:302017-06-09T00:09:25+5:30
पुरेसा पाऊस झाल्यावर पेरणी होणार असली तरी गुरूवारी मृग नक्षत्रास सुरूवात झाल्याने यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.

खरिपाचे ठरले नियोजन, ७.२८ लाख हेक्टर क्षेत्र
मृग नक्षत्रास सुरुवात : बियाणे उपलब्ध, खतांचे आवंटन मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पुरेसा पाऊस झाल्यावर पेरणी होणार असली तरी गुरूवारी मृग नक्षत्रास सुरूवात झाल्याने यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.यंदा खरिपासाठी सरासरी सात लाख २८ हजार ९१२ हेक्टरचे नियोजन आहे. यासाठी आवश्यकतेनुसार एक लाख ४० हजार क्विंटल बियाण्यांची तरतूद कृषी विभागाने केली आहे. तसेच एक लाख ४५ हजार ५५० मे.टन साठ्याच्यास तुलनेत एक लाख ३० हजार ३०० मे.टन रासायनिक खतांचे आंवटन मंजूर करण्यात आले आहे.
जिल्ह्यात मृगनक्षत्रास सुरूवात झाल्यानंतर साधारणत: खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू होते. एखादा पाऊस पडल्यावर पेरणीपूर्व मशागत व त्यानंतर ८० ते १०० मि.ली.पाऊस झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पेरणीला सुरूवात होते.
तत्पूर्वी साधारणपणे २० मे नंतर संरक्षित सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी धूळवाफ पेरणी करतात. यंदा मात्र हे मान्सूनपूर्व पेरणीचे क्षेत्र कमी होते.
सरासरी इतकाच पाऊस
अमरावती : याला अन्य कारणे असली तरी हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा सरासरी इतकाच पाऊस असल्यामुळे खरिपाची पेरणी नियोजित वेळी व सरासरी क्षेत्राइतकीच होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ७.२८ लाख हेक्टर पेरणीक्षेत्र राहणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ५७ हजार ७९१ हेक्टर, भातकुली ५० हजार ३५५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ६७ हजार ७६२ हेक्टर, तिवसा ४५ हजार ४४४ हेक्टर, चांदूररेल्वे ४२ हजार ६५१ हेक्टर, धामणगाव रेल्वे ५५ हजार ४३८ हेक्टर, मोर्शी ६२ हजार ८४१, वरूड ४८ हजार ६४६ हेक्टर, चांदूरबाजार ६० हजार ९९७ हेक्टर, अचलपूर ४७ हजार ९८३ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ४५ हजार ५०३ हेक्टर, दर्यापूर ७० हजार ४६४ हेक्टर, धारणी ४६ हजार ६७२ हेक्टर व चिखलदरा तालुक्यात २५ हजार २५४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.