सर्वसाधारण सभेत ‘अमृत’वर खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:32 IST2021-01-13T04:32:29+5:302021-01-13T04:32:29+5:30

अचलपूर नगर परिषद, प्रशासकीय उत्तराने नगरसेवक संतप्त, बहिर्गमन अनिल कडू परतवाडा : अचलपूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अमृत योजनेवर ...

Khadajangi on 'Amrit' in the general meeting | सर्वसाधारण सभेत ‘अमृत’वर खडाजंगी

सर्वसाधारण सभेत ‘अमृत’वर खडाजंगी

अचलपूर नगर परिषद, प्रशासकीय उत्तराने नगरसेवक संतप्त, बहिर्गमन

अनिल कडू

परतवाडा : अचलपूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अमृत योजनेवर चांगलीच खडाजंगी झाली. अमृत योजनेंतर्गत जोडल्या न गेलेली पाईप लाईन, शिल्लक असलेल्या जोडण्या, नागरिकांना अनुपलब्ध पिण्याचे पाणी, शहरावासीयांना बोअरवेलवरून होत असलेला पाणीपुरवठा, अमृत योजनेचे काम करताना फोडले गेलेले रस्ते याबाबत सभागृहात नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला.

योजना असूनही नागरिकांना पाणी मिळत नसल्याबाबत नगरसेवकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. अमृत योजनेचे ९८ टक्के काम पूर्ण झाल्याच्या प्रशसनाच्या उत्तराने नगरसेवक अधिकच संतापले. बंटी ककरानीया यांनी सभागृहातून बहिर्गमन केले. ते सभागृहात परतलेच नाहीत.

अचलपूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा ११ जानेवारीला दुपारी १२ वाजता घेण्यात आली. अमृत योजनेंतर्गत शिल्लक निधी व व्याजाच्या रकमेतून पाणीपुरवठासंबंधी वाढीव अतिरिक्त काम करण्याबाबतचा विषयही या सर्वसाधारण सभेत मंजूर केला गेला.

परतवाड्यातील आठवडी बाजारातील ओट्यांसमोरील रस्ते बनविण्याच्या व सिमेंट काँक्रिटिंग करण्याच्या कामावर सभागृहात गरमागरम चर्चा झाली. संबंधित कंत्राटदार आणि प्रशासकीय यंत्रणेकडून त्याला दिले जात असलेले अवाजवी सहकार्य यावरही सभागृहात ताशेरे ओढले गेले, तर नौबागपूर येथील प्रभाग १६ मधील भूखंडावरील आरक्षण हटवून बेघरांसाठी नव्याने घरकुल देण्याचा व त्यादृष्टीने तेथील अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव सभेत मंजूर केला गेला.

अग्निशमन विभागात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी लावण्याबाबत, परतवाड्यातील कोट ते लालपूल मार्गाला साने गुरुजींचे नाव देण्याबाबत, अचलपूर शहरातील उपजिल्हा रुण्यालय ते माळवेशपुरा या १२ मीटर डी.पी. रोडच्या मध्ये येणारा खासगी भूखंड ताब्यात घेण्याबाबत आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या अनुषंगाने असलेल्या विषयांवरही सर्वसाधारण सभेत चर्चा पार पडली.

बॉक्स

मालमत्ता करात सूट

अचलपूर नगर परिषद अंतर्गत माजी सैनिकांना मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ताकर माफी योजनेंतर्गत करात सूट देण्याबाबतचा निर्णय या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. अशाप्रकारे मालमत्ता करात सूट देणारी अचलपूर नगर परिषद ही राज्यातील पहिती नगर परिषद असल्याचे, आरोग्य सभापती संजय तट्टे यांनी स्पष्ट केले.

कोट

अमृत योजनेतील अपूर्ण कामे आणि त्यावर प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या असमाधानकारक उत्तराने सभागृहात त्यावर वातावरण तापले होते. नगरसेवक बंटी ककरानिया यांनी यादरम्यान सभागृहातून बहिर्गमन केले.

- संजय तट्टे, आरोग्य सभापती, न.प.अचलपूर

Web Title: Khadajangi on 'Amrit' in the general meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.