शिधापत्रिकेवरून केरोसीन बेपत्ता
By Admin | Updated: January 25, 2015 23:05 IST2015-01-25T23:05:39+5:302015-01-25T23:05:39+5:30
एकीकडे सामान्यांना अन्न सुरक्षेचे कवच देण्याची चर्चा झडत असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांच्या शिधापत्रिकेतून जीवनावश्यक मानल्या जाणाऱ्या वस्तू हळूहळू बेपत्ता होत आहेत.

शिधापत्रिकेवरून केरोसीन बेपत्ता
अमरावती : एकीकडे सामान्यांना अन्न सुरक्षेचे कवच देण्याची चर्चा झडत असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांच्या शिधापत्रिकेतून जीवनावश्यक मानल्या जाणाऱ्या वस्तू हळूहळू बेपत्ता होत आहेत. केरोसीन हे त्यापैकीच आहे. वर्षभरात दोन वेळा मोठी कपात झाल्याने २८ लाखांहून अधिक लोकसंख्येच्या जिल्ह्यात आता केरोसीनचा पुरवठा जेमतेम १० लाख ८० हजारांवर येऊन ठेपला आहे.
सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूची हमी देण्यासाठी एकीकडे केंद्र शासनस्तरावर अन्न सुरक्षा विधेयक असताना दुसरीकडे त्याचवेळी स्वस्त धान्य दुकानातील जीवनावश्यक वस्तू कमी होत चालल्या आहेत. केरोसीनचे उत्तम उदाहरण ठरावे, असा हा प्रत्यय आहे. जिल्ह्याची लोकसंख्या सातत्याने वाढत असून अमरावती शहराची लोकसंख्या ७ लाख तर जिल्ह्याची लोकसंख्या २१ लाखांच्या पुढे पोहोचली आहे. दुसरीकडे मात्र केरोसीनचा कोटा कमी होऊन ६ लाख ४८ हजार लिटरपर्यंत ही कपात करण्यात आली आहे. वर्षभरात या घटत्या कोट्यामागे वाढत्या गॅसचे कारण सांगितले जाते.
ग्राहकांवर अन्याय
वर्षभरापूर्वी एकूण कोट्याच्या ३८ टक्के कोटा कमी झाला आहे. त्यानंतर तो कोटा आता १७ लाख २८ हजार झाला आहे. आता त्यात १० लाख ८० हजारांपर्यंत स्थिरावला आहे.
पूर्वी रॉकेलचा कोटा जवळपास १८ लाखाच्या आसपास होता. मात्र नव्याने आता तो १० लाख ८० हजारावर येऊन ठेपला आहे. रॉकेल कुणाला त्याचे निकष कडक होत आहेत त्यामुळे गॅस जोडणीचा पर्याय भलेही शासनाने दारिद्र्यरेषेखालील नागरिकांनाही खुला ठेवला असला तरी खरोखर ज्याची गॅस जोडणीसह सिलिंडर खरीदीची ऐपत नाही त्यांनाही केरोसीन मिळविणे सोपे राहिलेले नाही. (प्रतिनिधी)