कारागृहाच्या तटावर ‘जागते रहो’
By Admin | Updated: October 12, 2015 00:24 IST2015-10-12T00:24:15+5:302015-10-12T00:24:15+5:30
मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या १२ पैकी दोन आरोपींना शनिवारी येथील मध्यवर्ती कारागृहात आणल्याच्या पार्श्वभूमिवर ...

कारागृहाच्या तटावर ‘जागते रहो’
अमरावती : मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या १२ पैकी दोन आरोपींना शनिवारी येथील मध्यवर्ती कारागृहात आणल्याच्या पार्श्वभूमिवर कारागृहाच्या तटावर रविवारपासून खडा पहारा सुरु झाला आहे. ‘जागते रहो’चे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले असून सुरक्षा मनोऱ्यावर बंदुकधारी रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
सोहेल मोहम्मद शेख (४३), तनवीर अहमद अन्सारी (४५) या आजन्म कारावासाताली दोन आरोपींना मध्यवर्ती कारागृहात हलविल्यानंतर या घडामोडी युध्दस्तरावर घडल्यात. मुंबईच्या आॅर्थर रोड, येरवडा, आणि नागपूरनंतर अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा अत्यंत कडक असल्याची कारागृह प्रशासनात नोंद आहे.
येथील मध्यवर्ती कारागृहाच्या अंडा बराकीत यापूर्वी अरुण गवळी यांनादेखील बंदिस्त ठेवण्यात आले होते. मध्यंतरी चंद्रपूर, गडचिरोली येथे नक्षली कारवाया करणाऱ्या आठ जणांना सुरक्षेच्या अनुषंगाने नागपूर कारागृहातून अमरावती मध्यवर्ती हलविण्यात आले होते. या आठही जणांना कारागृहातील अंडा बराकीत बंदिस्त ठेवण्यात आले होते.
बॉम्बस्फोटातील दोन बंदिस्त आरोपी कायम
यापूर्वी मुंबई बॉम्बस्फोटातील दोन आरोपींना मुंबईच्या आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून अमरावतीत सुरक्षेच्या अनुषंगाने बंदिस्त केले होते. या खटल्यातील सर्वच आरोपींना आजन्म कारावास झाला होता. तेव्हापासून हे दोन्ही आरोपी येथील कारागृहातच बंदिस्त असून ते शिक्षा भोगत आहेत. आता ७/११ च्या बॉम्बस्फोटातीलदोन आरोपी पाठविण्यात आले आहेत.
अंडा बराकीत सुरक्षा नाहीच
कारागृहातील अतिसुरक्षित अंडा बराकीत (वर्तुळ) काही वर्षांपासून कोणतेच कैदी ठेवले जात नाहीत. सर्व कैद्यांना सामान्य बराकीत ठेवण्यात येते. सूर्योदय ते सूर्यास्त असा दिनक्रम असलेल्या कैद्यांना नियमानुसार वाटचाल करावी लागते. अंडा बराकीत कैदी बंदिस्त नसल्यामुळे अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा लावण्याचा बोजादेखील प्रशासनावर पडत नसल्याचे येथील चित्र आहे.