जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याकडून कट्टा जप्त, बडनेरा पोलिसांची कारवाई
By प्रदीप भाकरे | Updated: March 23, 2024 17:33 IST2024-03-23T17:32:21+5:302024-03-23T17:33:22+5:30
एका महिलेच्या तक्रारीवरून सुनील कैथवाससह अन्य दोघांविरूध्द बडनेरा पोलिसांनी २० मार्च रोजी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला होता.

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याकडून कट्टा जप्त, बडनेरा पोलिसांची कारवाई
अमरावती: दुचाकी लावण्याच्या कारणातून झालेल्या वादादरम्यान दुचाकीचे नुकसान व जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात हव्या असलेल्या आरोपीकडून देशीकट्टा व दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली. २३ मार्च रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास त्याला अकोला नाका, बडनेरा हायवे रोडवरून ताब्यात घेण्यात आले. सुनिल भगवानदास कैथवास (वय ३४ वर्षे, रा. माताफैल, जुनी वस्ती, बडनेरा) असे अटक आरोपीचे नाव आहे.
एका महिलेच्या तक्रारीवरून सुनील कैथवाससह अन्य दोघांविरूध्द बडनेरा पोलिसांनी २० मार्च रोजी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला होता. त्याचा शोध घेत असताना तो अकोला नाका परिसरात आढळून आला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना देशी बनावटीचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस आढळून आली. त्याच्याविरूध्द आर्म ॲक्टप्रमाणे कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली बडनेराचे ठाणेदार पुनित कुलट, उपनिरिक्षक तुषार गावंडे, अंमलदार अहेमद अली, मंगेश परिमल, रोशन निसंग, विक्रम नशिबकर, जावेद पटेल, अभिजीत गावंडे, राजकुमार राऊत यांनी ही कारवाई केली.