काठेवाडीला अटक; जनावरे ताब्यात

By Admin | Updated: July 10, 2014 23:20 IST2014-07-10T23:20:37+5:302014-07-10T23:20:37+5:30

काठेवाडी गुरांना राज्यात चराईबंदी या शासन आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी येथील वनविभाग सरसावला आहे. त्यानुसार वडाळी वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या जेवड बीटमध्ये नियमबाह्य गुरांची

Kathewadi arrested; Possession of animals | काठेवाडीला अटक; जनावरे ताब्यात

काठेवाडीला अटक; जनावरे ताब्यात

कारवाई : गुरांच्या बंदोबस्तासाठी वनविभाग सरसावला
अमरावती: काठेवाडी गुरांना राज्यात चराईबंदी या शासन आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी येथील वनविभाग सरसावला आहे. त्यानुसार वडाळी वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या जेवड बीटमध्ये नियमबाह्य गुरांची चराई करणाऱ्या एका काठेवाडीला बुधवारी अटक करण्यात आली आहे. गंगाराम ज्वाला भडवाल (४९ रा. रत्नापूर) असे अटक करण्यात आलेल्या काठेवाडीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, वनजमिनीवर काठेवाडी गुरांच्या चराईला मनाई असताना मागील काही वर्षांपासून काठेवाडी जंगललगतच्या परिसरात गुरांसह ठिय्या मांडून आहेत. काही वनअधिकाऱ्यांना हाताशी धरुन राखीव जंगलात बिनदिक्कतपणे गुरांची चराई करण्याची मोहीम काठेवाडी फत्ते करीत असल्याचे चित्र आहे. मात्र काठेवाडी जनावरांच्या चराईने वनसंपदा नष्ट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के. लाकडे यांनी कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. वडाळी वनवर्तुळातील नियतक्षेत्र राखीव वनखंड क्र.९ मध्ये काठेवाडी गुरांची चराई होत असल्याच्या माहितीच्या आधारे वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले तेंव्हा अवैधरीत्या ७५ ते १०० काठेवाडी गुरे चराई करीत असल्याचे निदर्शनास आले. मात्र वनकर्मचारी आल्याचे बघून काठेवाडींनी ही जनावरे हाकलून लावली.
यावेळी वनकर्मचाऱ्यांसोबत काठेवाडींनी वादही केला. अखेर वनकर्मचाऱ्यांनी १५ गुरे ताब्यात घेतले. ही गुरे ताब्यात घेताना वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली. यावेळी पाच ते सहा काठेवाडींच्या रोषाला वनकर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागले. यावेळी काठेवाडींनी वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र काठेवाडींची मुस्कटदाबी करण्याचा ध्यास वनविभागाने घेतल्याने राखीव वनक्षेत्रात गुरांची चराई केल्याप्रकरणी गंगाराम भडवाल यांच्याविरुध्द भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१)अ,ड,फ, अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. तसेच वनकर्मचाऱ्यांनी जप्त केलेल्या गाई पळवून नेणे, जीवे मारण्याची धमकी देणे याबाबत फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. गुरुवारी आरोपीला न्यायालयात सादर करण्यात आले असता, २४ जुलैपर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे.
काठेवाडी गुरांच्या चराई बंदीविरुद्ध केलेली कारवाई ही उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी पी. के. लाकडे, वनपाल विजय बारब्दे, वनरक्षक अनिस शेख, मनोज ठाकूर, नीलेश करवाळे, एच.एम. आवनकर, एस. आर. पाली, बी.डब्लु. खैरकर, पी.बी. शेंडे, किशोर धोटे, शंकर खंडारे, सुदाम कदम, बले यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली. (प्रतिनिधी)

Web Title: Kathewadi arrested; Possession of animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.