बहिरमच्या काशी तलावाला नवे रूप
By Admin | Updated: July 12, 2015 00:30 IST2015-07-12T00:30:24+5:302015-07-12T00:30:24+5:30
अस्मानी संकटावर मात करण्यासाठी यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात राज्य शासनाने जलयुक्त शिवार मोहीम राबविली आहे.

बहिरमच्या काशी तलावाला नवे रूप
जलयुक्त शिवार अभियान : भूजलस्तर वाढविण्याचा आटोकाट प्रयत्न
सुमित हरकुट चांदूरबाजार
अस्मानी संकटावर मात करण्यासाठी यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात राज्य शासनाने जलयुक्त शिवार मोहीम राबविली आहे. कमी खर्चात मोठा फायदा मिळवून देणाऱ्या या योजनेमुळे पहिल्याच पावसाचे पाणी नद्या-नाल्यांमध्ये अडविण्यात आल्याने जमिनीतील भूजलस्तर वाढविण्यास मदत होईल. यामुळे शेतातील विहिरीची पाण्याची पातळी वाढल्यास सुरुवातीपासून पिकांना पाणी देणे शक्य होणार आहे. ज्या भागात जलयुक्त शिवाराची कामे झाली त्या भागात भूगर्भातील पाण्यात वाढ होऊन शेतकरी स्प्रिंकलर व ठिबक सिंचनाद्वारा ओलीत करून पिकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नदी-नाल्यांना पाणी असल्यामुळे हे शक्य होत आहे. या अभियानअंतर्गत तालुक्यात १७ गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामे झाली आहेत. या गावांमध्ये नऊ कोटी ६० लक्ष रुपये खर्च करून जलसंधारणाची ४२३ कामे हाती घेण्यात आली. यापैकी ३० जून २०१५ पर्यंत ३०२ कामे पूर्ण होऊन उर्वरित कामे ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मंजूर कामापैकी ‘अ’ गटातील २३७ कामे पूर्ण झाली आहेत. ‘ब’ गटामधील उर्वरित कामे ३० नोव्हेंबरपूर्वी पूर्ण केले जातील. ‘क’ गटामधील १२ कामे मंजूर असून प्रक्रिया पूर्ण होताच या कामांनाही लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी दिली आहे.
जलयुक्त शिवारअंतर्गत सातपुड्याच्या पायथ्याशी असणारे प्रसिद्ध व जुन्या काशी तलावाचे खोलीकरण करण्यात आले आहे. या तलावातील शेकडो ट्रॅक्टर गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आले आहे. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची जमीन सुपीक होणार आहे. या तलावाची भिंत बांधल्यामुळे तलावात पावसाचे भरपूर पाणी अडणार आहे. यामुळे बहिरम येथील काशी तलावाचे नैसर्गिक सौंदर्य न्याहाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील व त्याचप्रमाणे बहिरम यात्रेत मुबलक पाणीपुरवठा होऊ शकेल व परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळीसुद्धा वाढणार आहे.
धरणातून वाया जाणारे पाणी एकत्रित करून पुन्हा ओलिताकरिता उपलब्ध झाले आहे. यासाठी मंजूर निधीपैकी ४ कोटी १६ लक्ष रूपये जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडून उपलब्ध करून दिले आहे. उर्वरीत निधी रोजगार हमी योजनेमधून खर्च करण्यात आले आहे. तालुक्यातील १७ गावांमध्ये २५ हजार वृक्षलागवड होणार असून यापैकी १६ हजार वृक्षांची लागवड पूर्ण झाली आहे. महसूल विभागाबरोबर कृषी विभाग, वनीकरण, पाटबंधारे व पंचायत समिती यांचेसुद्धा सहकार्य मिळाले आहे. या अभियानामुळे व परिसर वृक्षवेली व पाण्याने बहरदार निश्चित होणार आहे.