चिखलदरा (अमरावती) : जिल्ह्यात गुरुवारी दुपारी सर्वत्र धो-धो पाऊस बरसला. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ परिसराला वादळाचा तडाखा बसला. दोन शाळांसह घरांचे छप्पर उडाले. यात सहा विद्यार्थी जखमी झाले. वीज कोसळून तीन गुरांसह बकरी मृत झाल्यात. परिसरातील झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब वाकल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजतापासून ३.३० वाजेपर्यंत तब्बल दोन तास वादळासह विजेच्या कडकडाटात अवकाळीचा जोरदार पाऊस झाला. काटकुंभ येथील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर उडाल्याने अतुल सोमा चतुरकर (१६), रा. काटकुंभ तर बामादेही येथील फत्तुजी झारखंडे विद्यालयाचे जय मिश्रीलाल झाडखंडे (१२), उर्मीला हिरालाल भुसूम (१४), भवनेश्वरी जगदीश नागले (११), मिनाक्षी शंकर कास्देकर (१२), सुनीता केंडे बेठेकर (१२), रेशमा रमेश नागले (१३) सर्व रा.बामादेही हे विद्यार्थी जखमी झालेत. त्यांच्यावर काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. वीज कोसळून शालीकराव काळमा बेठेकर यांची एक गाय ठार झाली तर बैल भाजल्याने गंभीर जख्मी झाला. कोयलारी येथील रामचरण सलामे यांचा बकरा ठार झाला. तर डोमा येथील कालू बेठे यांचा बैल ठार झाला. चुरणी येथील मंगल मुंगा सावलकर यांचा बैल ठार झाला. या वादळाने परिसरातील शंभर वर्षे जुनी झाडे उन्मळून पडली. ११ के.व्ही. विद्युत खांब वाकून जमिनीवर कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. घरांसह गोठ्यांचे छप्पर उडालेअवकाळी पावसासह वादळ वा-याच्या तडाख्याने बामादेही येथील अरुण सुरजे, साहेबलाल बेठेकर, सुखदेव नागले, खांजी धिकार, अंतु सुरजे, जीवन झाडखंडे, नितीन झाडखंडे, किसन सेकुकर, राजेश झाडखंडे, सुनील बेठेकर, अतुल झारखंडे, मंगल धुर्वे, सावºया झाडखंडे, गुलाब हरसुलेसह आदींच्या घरांची पडझड होऊन गोठ्यांचे छप्पर उडाले.
२० गावांचा विद्युत पुरवठा खंडीत गुरुवारच्या वादळाच्या तडाख्यात परिसरातील ११ के.व्ही. विद्युत खांब वाकल्याने जवळपास २० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी परिसरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले असून पाणी पुरवठा योजना, दळण यंत्र आदी बंद पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
काटकुंभ व बामादेही गावाला वादळामुळे सात विद्यार्थी किरकोळ जखमी झाले, तर शाळांचे छप्पर उडाले. नुकसानीची माहिती घेण्यासाठी तलाठी व संबंधितांना निर्देश दिले आहे. वीज कोसळून तीन जनावरांचा मृत्यू झाला. - प्रदीप पवार, तहसीलदार, चिखलदरा