दारूबंदी करण्याकरिता करजगाववासी सरसावले
By Admin | Updated: July 24, 2015 00:12 IST2015-07-24T00:12:08+5:302015-07-24T00:12:08+5:30
तालुक्यातील करजगाव (गांधीघर) येथे अनेक दिवसांपासून अवैध दारुविक्री सुरु आहे.

दारूबंदी करण्याकरिता करजगाववासी सरसावले
आक्रमक : तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांचे उपोषण सुरू
वरूड : तालुक्यातील करजगाव (गांधीघर) येथे अनेक दिवसांपासून अवैध दारुविक्री सुरु आहे. येथील एका हॉटेलमध्ये दारुविक्री होत असल्याने गावातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत. वारंवार तक्रारी करुनही पोलिसांनी दखल घेतली नसल्याने अखेर महिला बचतगट, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी दारुबंदीकरिता सरसावले असून स्थानिक तहसील कार्यालयापुढे शेकडो लोकांनी उपोषण सुरु केले आहे.
तालुक्यातील करजगाव (गांधीघर) येथे अवैध दारुविक्रीला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी लगतच्या मिर्झापूर खदानीजवळ महिला बचतगटातील महिला व गावकऱ्यांनी दारु पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली होती. पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला होता. परंतु त्यानंतर पुन्हा करजगावच्या बसथांब्याजवळ विनापरवानगी हॉटेल सुरु झाले असून या हॉटलेमध्ये दारुविक्री होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे गावातील कायदा, व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे तसेच मद्यपींचे संसार वाचविण्याच्या दृष्टीने तातडीने या हॉटेलमधून होणारी दारुविक्री बंद करावी, अशी मागणी सरपंच सत्यवान ढोले, उपसरपंच सतीश बोहरुपीसह ग्रामपंचायत सदस्य, महिला बचतगट, शेकडो महिला-पुरुषांनी केली आहे. यासाठी तहसीलपुढे मंगळवारपासून उपोषण सुरु केले. याला काँग्रेस, युवक काँग्रेसने पाठिंबा दर्शविला असून यावेळी माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम ठाकरे यांनीदेखील समर्थन दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)