शंकरबाबांच्या मानसकन्येचे खासदारांकडून कन्यादान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 22:29 IST2018-11-17T22:28:50+5:302018-11-17T22:29:18+5:30
अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या वैशालीचा विवाह येत्या १४ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. चेंबूर येथे कचऱ्यात टाकलेल्या या मूकबधिर मुलीचा २३ वर्षे सांभाळ केल्यानंतर आता हा काळजाचा तुकडा शंकरबाबांपासून लग्नानंतर दुरावणार आहे. तिचे कन्यादान खासदार आनंदराव अडसूळ हे करणार आहेत.

शंकरबाबांच्या मानसकन्येचे खासदारांकडून कन्यादान
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या वैशालीचा विवाह येत्या १४ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. चेंबूर येथे कचऱ्यात टाकलेल्या या मूकबधिर मुलीचा २३ वर्षे सांभाळ केल्यानंतर आता हा काळजाचा तुकडा शंकरबाबांपासून लग्नानंतर दुरावणार आहे. तिचे कन्यादान खासदार आनंदराव अडसूळ हे करणार आहेत.
सन १९९५ मध्ये वैशाली अचलपूर तालुक्यातील वझ्झर फाटा येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर बालगृहात दाखल झाली. या बालगृहाची जबाबदारी शंकरबाबा पापळकर यांनी स्वीकारली आहे. मुंबईच्या चेंबूर भागात वैशालीला तिच्या अज्ञात माता-पित्याने कचºयाच्या ढिगावर टाकून पलायन केले. पोलिसांनी तिला उचलून डोंगरी येथील रिमांड होममध्ये दाखल केले. दोन वर्षांपर्यंत तिच्या माता-पित्यांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी बालकल्याण समितीच्या आदेशान्वये तिला शंकरबाबा पापळकर यांच्या स्वाधीन केले. तिचे वैशाली असे नामकरण करण्यात आले. मूकबधिर असलेली ही वैशाली आता २५ वर्षांची झाली असून, तिचा विवाह संस्थेतच मोठा झालेला मूकबधिर अनिलसोबत जुळविला आहे.
१४ जानेवारीला लग्न
वैशाली व अनिल यांचे लग्न १४ जानेवारी २०१९ रोजी नियोजित केले आहे. अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात थाटात हा सोहळा पार पडेल, असे वचनच खा. अडसूळ यांनी शंकरबाबांना दिले. आतापर्यंत त्यांच्या संस्थेतील मुलींचे विवाह थाटात पार पडले. त्यामुळे या विवाह सोहळ्याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे.
आजपासून ही माझी मानसकन्या
कन्यादानाचे दायित्व पार पाडावे, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांनी केली असता, त्यांनी त्यास होकार दर्शविला आणि आजपासून ही माझी मानसकन्या झाली, असे सांगितले. या घडामोडीबद्दल पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी समाधान व्यक्त केले.
पुनर्वसनाची काळजी झाली दूर
वैशाली वयात आल्यानंतर तिच्या पुनर्वसनाची काळजी शंकरबाबांना लागली होती. सुदैवाने संस्थेतच लहानाचा मोठा झालेला अनिल याचे वैशालीसोबत सूर जुळले आणि दोघांनी लग्नगाठीत एकत्र येण्याचा निर्णय घेतला. अनिलला पुणे येथून शंकरबाबांच्या स्वाधीन करण्यात आले होते.