लॉकडाऊनमध्ये सुरक्षित घरी सोडलेल्या युवतीचे आमदारांकडून कन्यादान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:09 IST2021-06-17T04:09:49+5:302021-06-17T04:09:49+5:30

धारणी : तब्बल ८०० किमी अंतर गाठून हैद्राबादहून धारणी तालुक्यातील गावी पोहोचलेल्या युवतीने या प्रवासादरम्यान तिला मदत करणाऱ्या आमदारांच्या ...

Kanyadan from the MLA of the girl who was left at home in lockdown | लॉकडाऊनमध्ये सुरक्षित घरी सोडलेल्या युवतीचे आमदारांकडून कन्यादान

लॉकडाऊनमध्ये सुरक्षित घरी सोडलेल्या युवतीचे आमदारांकडून कन्यादान

धारणी : तब्बल ८०० किमी अंतर गाठून हैद्राबादहून धारणी तालुक्यातील गावी पोहोचलेल्या युवतीने या प्रवासादरम्यान तिला मदत करणाऱ्या आमदारांच्या हस्ते कन्यादान व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली. एक वर्षांपूर्वी लॉकडाऊनच्या काळात घडलेला हा प्रसंग तोपर्यंत विसरले होते. मात्र, तिच्या आग्रहाखातर त्यांनी सदर युवतीचे कन्यादान केले.

मार्च २०२० मध्ये आमदार राजकुमार पटेल यांना हैद्राबादवरून एक फोन कॉल आला. ज्यामध्ये धारणी पासून १५ किलोमीटर अंतरावरील मोखा गावातील सविता संतुलाल सावलकर या २४ वर्षीय तरुणीने गावी यायचे आहे, मार्गदर्शन करा, अशी विनंती केली. त्यावेळी हैद्राबाद ते नागपूर रेल्वे सेवा सुरू होती . आमदारांनी तिला नागपूरला ट्रेनने येण्याचे सांगून पुढील व्यवस्थेसाठी नागपूर येथे कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पेठे यांच्याशी संपर्क केला.

सविता ही हैद्राबाद येथे ब्युटी पार्लरचा व्यवसाय करीत होती. तिने हैदराबाद ते नागपूर हे पाचशे किलोमीटर अंतर रेल्वेने गाठले. या दरम्यान आमदारांशी सतत भ्रमणध्वनीवर संपर्क सुरू होते. सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पेठे यांनी लगेच नागपूर येथील रेल्वे स्थानकाहून तिला घरी नेले. दुसऱ्या दिवशी सकळी एक रुग्णवाहिकेत बसवून अमरावतीला पाठविले. धारणी येथून एक रुग्णवाहिका अमरावती येथे गेली होती . सदर रुग्णवाहिकेच्या चालकाला आमदारांनी संपर्क साधून सविताला धारणी येथे आणण्याची सूचना केली. धारणी येथे मध्यरात्री रुग्णवाहिका पोहोचल्यानंतर भावाच्या दुचाकीवर तिने घर गाठले.

दरम्यानच्या काळात आमदार पटेल यांना या मदतीचा विसर पडला. विशेष म्हणजे, त्यांनी सविताला प्रत्यक्ष पाहिलेसुद्धा नव्हते. ११ जून रोजी तिने आमदारांशी संपर्क साधून मदतीबद्दल आभार व्यक्त केले व तिचे कन्यादान करण्याची विनंती केली. आमदार पटेल यांनी १२ जून रोजी मोखा गाव गाठून एका पित्याप्रमाणे कन्यादानाचे कर्तव्य पूर्ण पाडले.

Web Title: Kanyadan from the MLA of the girl who was left at home in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.