अचलपुरात होणार केळी संशोधन केंद्र
By Admin | Updated: August 12, 2014 23:30 IST2014-08-12T23:30:03+5:302014-08-12T23:30:03+5:30
विभागात संत्रा पिकांबरोबर केळी पिकात होणारी वाढ लक्षात घेता डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने अचलपुर येथे केळी संशोधन केंद्रासाठी प्रस्ताव दिला आहे. राज्य शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाच्या

अचलपुरात होणार केळी संशोधन केंद्र
जितेंद्र दखणे - अमरावती
विभागात संत्रा पिकांबरोबर केळी पिकात होणारी वाढ लक्षात घेता डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने अचलपुर येथे केळी संशोधन केंद्रासाठी प्रस्ताव दिला आहे. राज्य शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे पाच कोटी रुपयांची मागणी केली आहे.
विदर्भातील प्रमुख फळपिकांमध्ये संत्र्याचा समावेश होता. पश्चिम विदर्भातील अमरावती आणि पूर्व विदर्भातील नागपुर परिसरात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्र संत्र्याखाली आहे. नागपुरची ओळख‘आॅरेंज सिटी’ असली तरी सर्वाधिक संत्रा लागवड क्षेत्र मात्र अमरावती जिल्ह्यात आहे. या भागात ७५ हेक्टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे.
संत्र्यानंतर परिसरात केळी लागवडी देखील वाढत आहे. अंजनगांव सुर्जी, अचलुर, परतवाडा या भागात हे क्षेत्र आहे. अकोला जिल्ह्यातील आकोट, तेल्हारा या भागातही केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. आकोट व तेल्हारा हे दोन तालुके अमरावती जिल्ह्याच्या सीमेलगत आहे. या भागातही केळी लागवड क्षेत्र वाढीस लागल्याने या भागात शासकीय अनुदानातून सुमारे सात रायपनिंग चेंबरची उभारणी केली आहे. अंजनगांव, परतवाडा परिसरात ही यंत्रणा कार्यान्वीत आहे. यासाठी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून पैसे दिले जातात.
दरम्यान, विभागात केळी लागवड सुमारे ५५७४ हेक्टर क्षेत्रावर पोचल्याने या भागात या पिकांकरीता स्वतंत्र संशोधन केंद्र असावे असा प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शासनाला दिला आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत हा प्रस्ताव दिल्याची माहिती विद्यापीठ सूत्रांनी दिली. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळाले आहे. अचलपुर येथे विद्यापीठाचे प्रादेशिक संशोधक केंद्र असून त्याच परिसरात केळी संशोधन केंद्राची पायाभरणी केली जाणार आहे. यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. संशोधन केंद्रास मान्यता मिळेपर्यंत केळी संशोधन विषयक कार्य प्रभावित होऊ नये यासाठी विद्यापीठाने उद्यानविद्या शाखेतील एका तज्ञांची नियुक्ती केली आहे. आकस्मिक निधितून त्याकरीता ९१ लाख रुपयांची तरतूद करण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे.