अचलपूरमध्ये काकडा, धोतरखेडा, हनवतखेडा सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST2021-05-07T04:13:18+5:302021-05-07T04:13:18+5:30
फोटो पी ०६ हनवतखेङा परतवाडा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागात कोरोना संक्रमितांची वाढती संख्या चिंताजनक असून काकडा, ...

अचलपूरमध्ये काकडा, धोतरखेडा, हनवतखेडा सील
फोटो पी ०६ हनवतखेङा
परतवाडा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागात कोरोना संक्रमितांची वाढती संख्या चिंताजनक असून काकडा, धोतरखेडा व हनवतखेडा या गावांना सील करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
यात अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयंत बाबरे, तहसीलदार मदन जाधव यांचेसह पंचायत प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. यापूर्वी ३० एप्रिलला प्रशासनाने तालुक्यातील देवमाळी , कांडली, गौरखेडा, सावळी दातुरा, आरेगाव व नारायणपूर या गावांना सील केले आहे. ५ मे रोजी स्वतः एसडीओ संदीपकुमार अपार आणि गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांनी स्वतः काकडा गाव गाठून ते सील करून घेतले. यादरम्यान त्यांनी गावकऱ्यांशी व ग्राम प्रशासनाशी संवाद साधला. कोरोनाच्या अनुषंगाने पाळावयाच्या नियमावलीचीही जाणीव करून दिली.
काकडा गावात मागील १५ दिवसांत २० कोरोना रुग्ण निघाले असून दोन रुग्णांचे मृत्यू नोंदले गेले आहेत. तालुक्यातील पथ्रोट गावातही दुसऱ्या लाटेतील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या लक्षवेधक ठरली आहे. प्रशासनाने याला गांभीर्याने घेतले आहे. कोरोना नियमावलीसह जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केल्या जात आहे. यात गावातील काही दुकाने सील करण्यात आली आहेत.
अचलपूर तालुक्यात ५ मे रोजी ११५ कोरोना रुग्ण निघाले आहेत. अचलपूर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस हे कार्यालय अभ्यागतांसाठी बंद ठेवण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी कळविले आहे.