कांडलीच्या सरपंच सुषमा थोरात पायउतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:18 IST2017-10-08T00:18:36+5:302017-10-08T00:18:46+5:30
शहराला लागून असलेल्या कांडली ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमा थोरात पायउतार झाल्या आहेत. शनिवारी झालेल्या विशेष सभेत १४ सदस्यांनी सरपंचाविरोधात, तर तीन सदस्यांनी त्यांच्या बाजूने हात उंचाविले.

कांडलीच्या सरपंच सुषमा थोरात पायउतार
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शहराला लागून असलेल्या कांडली ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमा थोरात पायउतार झाल्या आहेत. शनिवारी झालेल्या विशेष सभेत १४ सदस्यांनी सरपंचाविरोधात, तर तीन सदस्यांनी त्यांच्या बाजूने हात उंचाविले.
अचलपूर तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या कांडली ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमा थोरात यांच्याविरुद्ध ३ आॅक्टोबर रोजी १७ पैकी तब्बल १४ सदस्यांनी अविश्वास ठरावाचे पत्र तहसीलदार निर्भय जैन यांना दिले होते. यामुळे अविश्वास प्रस्तावावर शनिवारी विशेष सभा बोलविण्यात आली. ग्रामपंचायतीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दुपारी २ वाजता अविश्वास प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला.
सभा सुरू होण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत परिसरात गर्दी केली होती. विविध वाहनांतून चौदा सदस्यांचे आगमन झाले, तर सुषमा थोरात यांच्यासह तीन सदस्य होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त होता. कांडलीचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.
विरोधी सदस्यांचे देवदर्शन
अविश्वास ठरावाचे पत्र दिल्यावर ग्रामपंचायतीचे चौदा सदस्य शेगाव, ओंकारेश्वर, उज्जैन, अमरावती आदी ठिकाणी देवदर्शनास गेले होते. दरम्यान कांडली येथील सरपंचपदाचा वादाने तालुक्यात चांगलीच रंगत आणली होती. विरोधक एकसंघ राहिल्याची चर्चा तालुक्यात आहे.