पेढी कोपली; हाहाकार
By Admin | Updated: July 12, 2016 01:12 IST2016-07-12T01:12:39+5:302016-07-12T01:12:39+5:30
संततधार पावसामुळे जिल्ह्यातील महत्त्वांच्या नद्यांपैकी एक असलेल्या पेढीला रविवारी रात्री पूर आला. नया अकोला,

पेढी कोपली; हाहाकार
विस्कळीत : नया अकोला, वलगाव, थुगाव, रोहणखेडा, देवरा, फाजलापूर, दोनद, खानापूरला फटका
अमरावती : संततधार पावसामुळे जिल्ह्यातील महत्त्वांच्या नद्यांपैकी एक असलेल्या पेढीला रविवारी रात्री पूर आला. नया अकोला, वलगाव, थुगाव, रोहणखेडा, पर्वतापूर, देवरा, सावंगा, फाजलापूर, दोनद आणि खानापूर या गावांत नदी-नाल्यांनी थैमान घातले. नदीकाठच्या या सर्वच गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. आमदार यशोमती ठाकूर आणि जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सोमवारी पूरबाधित गावांना भेटी दिल्या.
अमरावती व भातकुली तालुक्यातील एकूण १३२ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पुरामुळे अनेक घरी रविवारी व सोमवारी चुली पेटल्या नाहीत. धान्य ओले झाले. घरातील साहित्य वाहून गेले. गोठ्यातील जनावरांनाही पुराचा फटका बसला.
प्रशासन नैसर्गिक आपत्तीवर यश मिळविण्यासाठी धडपडत असले तरी पुराच्या फटक्यानंतर आता महामारीचा मोठा धोका पुरबाधित लोकांसमोर उभा ठाकला आहे. पुरग्रस्त सर्वच गावांमध्ये तत्काळ प्रभावाने वैद्यकीय शिबिरे उघडण्याची नितांत आवश्यकता आहे. जंतूनाशक औषधांची फवारणी आणि डस्टींग वृत्त लिहिस्तोवर करण्यात आलेली नव्हती. पुरबाधित गावांमधील वृद्ध, अपंग आणि लहान मुलांसाठी आवश्यक त्या विशिष्ट सुविधा आरंभण्यात आलेल्या नव्हत्या. सर्वत्र दूषित वातावरण असल्याने डायरियाचा त्रास गावकऱ्यांना सुरु झाला आहे. गाद्या, कपडे ओलेचिंब झाल्याने गावकऱ्यांचे थंडीने हाल होत आहेत.
पाच तालुक्यात अतिवृष्टी
: पाच तालुक्यातील २५ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने नदीनाल्यांना पूर आला आहे. खोलगट भागात पाणी शिरल्याने ३०० च्या वर कुटूंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. ५ हजारांवर हेक्टरमधील शेतीत पाणी साचल्याने पिके धोक्यात आलेली आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५५.८ मि.मी. पाऊस पडला. यामध्ये अचलपूर ९३.२ मिमी, दर्यापुर ८०.३, अंजनगांव सुर्जी ७९ मिमी, धारणी ७२ मिमी व चिखलदरा तालुक्यात १७२.२ मिमी पाऊस पडला. ६५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस असल्याने ही अतिवृष्टी समजण्यात येते. या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्या दुथडी भरुन वाहत आहे. भातकुली तालुक्यात रविवारी सायंकाळी पेढी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने सावंगा, देवरा, फाजलापूर व जावरा या गावांचा संपर्क तुटला होता. नया अकोला, वलगांव, खानापूर, थुगांव,दोनद, पर्वतापूर रोहनखेड्यात पाणी शिरले.