आज ज्येष्ठा गौरी आवाहन
By Admin | Updated: September 1, 2014 23:13 IST2014-09-01T23:13:20+5:302014-09-01T23:13:20+5:30
भाद्रपद महिना आला की गौरी-गणपतीचे वेध लागतात. गणेशोत्सवाला धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. मंगळवारी गौरींची शुभ पाऊले घरोघरी उमटणार असून एव्हाना घरोघरी अडीच दिवसांच्या माहेरपणासाठी

आज ज्येष्ठा गौरी आवाहन
अमरावती : भाद्रपद महिना आला की गौरी-गणपतीचे वेध लागतात. गणेशोत्सवाला धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. मंगळवारी गौरींची शुभ पाऊले घरोघरी उमटणार असून एव्हाना घरोघरी अडीच दिवसांच्या माहेरपणासाठी येणाऱ्या ‘महालक्ष्मीं’च्या स्वागतासाठी जय्यत तयारी झाली आहे.
गौरींचा साजश्रुंगार खरेदी करण्यासाठी गर्दी उसळते. अद्यापही बाजारात महालक्ष्मींच्या सजावटीच्या वस्तू, दागिने, कोथळ्या, साड्या आणि इतर वस्तुंची रेलचेल आहे. ज्येष्ठा आणि कनिष्ठा अडीच दिवसांच्या माहेरपणासाठी येतात, अशी श्रद्धा आहे. या अडीच दिवसांत ज्येष्ठा-कनिष्ठेचे साग्रसंगीत पूजन करून त्यांची आवभगत करण्याची प्रथा आहे. विदर्भात महालक्ष्मीच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गल्लीबोळात घरोघरी यथाशक्ती हा सण साजरा केला जातो. सुरेख आरास करून शुचिर्भूत आणि प्रसन्न वातावरणात ज्येष्ठा गौरींचे पूजन केल्यास त्या नवसाला पावतात, अशी प्रगाढ श्रद्धा असल्याने विदर्भातील अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यान्पिढ्या महालक्ष्मी पूजनाचा सोहळा साजरा होतोे. यंदा मंगळवारी ज्येष्ठा गौरींची प्रतिष्ठापना होणार आहे. सायंकाळी ६ वाजून ७ मिनिटांपर्यंत मंगळवारी ज्येष्ठा गौरींची प्रतिष्ठापना करता येईल. बुधवारी ज्येष्ठा गौरी पूजनाचा मुहूर्त आहे. या दिवशी सोळा भाज्या, पुरणपोळी, फुलवरा आणि इतर पदार्थांच्या नैवेद्यांसह ज्येष्ठा गौरींचे पूजन केले जाते. गुरूवारी ज्येष्ठा गौरींचे विसर्जन होईल. या दिवशी मुरडपोळी आणि दही-दुधाच्या नैवेद्याने ज्येष्ठा गौरींना उदास अंत:करणाने निरोप दिला जातो.