आरागिरण्यांवर धाडसत्र सुरू; २० हजारांचे लाकूड जप्त
By Admin | Updated: October 10, 2015 00:32 IST2015-10-10T00:32:07+5:302015-10-10T00:32:07+5:30
आडजात वृक्षांची विनापरवानगी मोठ्या प्रमाणात कटाई होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने शुक्रवारी आरागिरण्यांवर धाडसत्र राबविले.

आरागिरण्यांवर धाडसत्र सुरू; २० हजारांचे लाकूड जप्त
अवैध कटाई : वलगावच्या नेहा वूडच्या संचालकावर गुन्हे
अमरावती : आडजात वृक्षांची विनापरवानगी मोठ्या प्रमाणात कटाई होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने शुक्रवारी आरागिरण्यांवर धाडसत्र राबविले. यात वलगाव मार्गावरील ‘नेहा वूड इंडस्ट्रिज’च्या संचालकांवर वनगुन्हे दाखल करण्यात आले असून २० हजार रुपये किमतीचे आंबा वृक्षाचे लाकूड जप्त करण्यात आले आहे.
वनविभागाने आडजात वृक्ष कटाईची परवानगी दिली नसताना ही कत्तल करुन ते शहरातील आरागिरण्यांमध्ये आणले जात असल्याची गुप्त माहिती वडाळी वनपरिक्षेत्राचे अधिकारी प्रदीप लाकडे यांना मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी आरागिरणी वनपाल योगिता मगर, वडाळीचे वनपाल विजय बारब्दे यांच्या नेतृत्वात आरागिरण्यांवर धाडसत्र राबविले. त्यानुसार वलगाव मार्गावरील ‘नेहा वूड इंडस्ट्रिज’च्या संचालकांनी विनापरवानगी १.२७९ इतक्या आंबा वृक्षांची कत्तल करुन लाकूड आणल्याचे स्पष्ट झाले.
महिला वनपालाची कारवाई
अमरावती : आरागिरणीबाहेर हे लाकूड पडले असताना परवान्याबाबत वनधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता आरागिरणी संचालक परवाने दाखवू शकले नाहीत. त्यामुळे आंब्याचे १.२७९ घनमिटर अवैध लाकूड आणल्याप्रकरणी ‘नेहा वूड इंडस्ट्रिज’चे संचालक सय्यद इस्माईल सय्यद बाबा यांच्याविरुध्द वनगुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त लाक डाची बाजारातील किंमत अंदाजे २० हजार रुपये इतकी असल्याचे वनपाल योगिता मगर यांनी सांगितले. आडजात वृक्षांच्या कटाईला परवानगी देण्याचा प्रस्ताव वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडे असताना आरागिरण्या संचालकांनी अवैध वृक्षकटाईचा सपाटा सुरु केला आहे. दिवसाढवळ्या ट्रकद्वारे अवैध लाकूड शहरात आणले जात असल्याचे चित्र आहे. आडजात वृक्षकटाईला परवानगी नसताना शहरात अवैध लाकूड येते कसे?, हा संशोधनाचा विषय आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के.लाक डे, आरागिरणी वनपाल योगिता मगर, वनपाल विजय बारब्दे, बाबूराव येवले यांनी केली आहे.