तंटामुक्त मोहिमेत जिल्ह्यात ७ हजार २९४ प्रकरणांत निवाडा
By Admin | Updated: September 16, 2015 00:13 IST2015-09-16T00:13:01+5:302015-09-16T00:13:01+5:30
गावातील तंटे गावातच समोपचाराने मिटविण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत ..

तंटामुक्त मोहिमेत जिल्ह्यात ७ हजार २९४ प्रकरणांत निवाडा
चांदूरबाजार : गावातील तंटे गावातच समोपचाराने मिटविण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत जिल्ह्याने सन २०१४-१५ या वर्षात गावतील ७ हजार २९४ तंट्यांना ‘न्याय’ मिळवून दिला आहे. अलीकडची चार वर्षांतील टक्केवारीही कायम राखली आहे. या तुलनेत विभागातील इतर चार जिल्हे माघारले आहेत.
गावात शांतता व सुव्यवस्था तसेच सलोख्याचे वातावरण कायम रहावे याकरिता राज्य शासनाने सन २००७ पासून तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. यामध्ये गावात क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेले तंटे मिटवून दिवाणी स्वरुपाचे, महसूल व फौजदारी तंट्यांना समोपचाराने मिटवून ‘न्याय’ देण्याची तरतूद करण्यात आली. राज्य शासनाने या मोहिमेत ७ वर्षांत कामगिरी बजावली.
शासनाच्या निकषांची अंमलबजावणी करून सर्वाधिक फौजदारी तंटे या समितीने मिटविले आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्याची कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. सन २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील तंटामुक्त समित्यांनी एकूण ७ हजार २६२ फौजदारी तंट्याचे निराकरण केले आहे. या वर्षामध्ये १७ हजार १२७ फौजदारी स्वरुपाचे तंटे जिल्ह्यामध्ये दाखल होते. त्यापैकी ७२६२ तंटे निकाली काढण्यात आलेत.
याचबरोबर १४२ दिवणी तंटे दाखल होते. त्यापैकी केवळ २० तंटे तर महसूली १०३ तंट्यापैकी केवळ १२ तंटे अमरावती जिल्ह्यात मिटविण्यात आले असले तरी फौजदारी तंट्यांनी मात्र जिल्ह्याची टक्केवारी कामय ठेवण्यात यश आले आहे. सन २०१४-१५ या वर्षात दाखल एकूण १७ हजार ३७२ तंट्यांपैकी ७ हजार २९४ तंटे मिटविण्यात आले याची टक्केवारी ४१.९८ एवढी आहे.
अलीकडच्या चार वर्षांत ही टक्केवारी १-२ टक्क्यांनी मागे पुढे आहे. सन २०११-१२ या वर्षात जिल्ह्याची तंटे मिटविण्याची टक्केवारी ४३.८६, २०१२-१३ मध्ये ४३.९८ टक्के, २०१३-१४ मध्ये ४२.७० तर २०१४-१५ मध्ये ही टक्केवारी ४१.९८ एवढी आहे. एकूणच अमरावती जिल्ह्याने दाखल तंटे मिटविण्यात सातत्य राखून घवघवीत यश संपादीत केले आहे. नेमक्या याच कामगिरीमुळे अमरावती जिल्हा तंटामुक्त मोहिमेत अव्वल स्थानावर आहे. (तालुका प्रतिनिधी)