‘तिची’ दयनीय अवस्था पाहून न्यायाधीशही गहिवरले!
By Admin | Updated: December 18, 2015 00:28 IST2015-12-18T00:28:25+5:302015-12-18T00:28:25+5:30
येथील प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी सुनावणी सुरू असताना या प्रकरणातील फिर्यादी महिला जळालेल्या अवस्थेत स्वत:च कोर्टात हजर झाली....

‘तिची’ दयनीय अवस्था पाहून न्यायाधीशही गहिवरले!
अग्निदग्धा पोहोचली न्यायालयात : उपचार सुविधा देण्याची मागणी
धारणी : येथील प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी सुनावणी सुरू असताना या प्रकरणातील फिर्यादी महिला जळालेल्या अवस्थेत स्वत:च कोर्टात हजर झाली आणि औषधोपचारासाठी पैसे मिळवून द्या, अशी केविलवाणी विनवणी तिने न्यायाधीशांकडे केली. हा प्रकार पाहून न्यायाधीशही गहिवरले.
तालुक्यातील धारणमहू येथील रहिवासी व मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील सासर असलेली विवाहिता कविता ऊर्फ अन्नू मथुराप्रसाद पटोरकर (२२) मागील वर्षी होळीच्या दिवशी सासरच्या मंडळींनी पेटविले होते. या घटनेत ती ८० टक्के भाजली होती. हे कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण धारणीच्या प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात सुरू आहे. बुधवारी या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू होती. सध्या ही पीडित महिला तिच्या आई-वडिलांकडे म्हणजे धारणमहू येथे राहून उपचार घेत आहे. परंतु आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने तिच्या माहेरची मंडळी मोठी कसरत करून तिच्यावर उपचार करीत आहेत. अशा स्थितीत उपचाराचा खर्च त्यांना पेलविणारा नाही. ही परवड असह्य झाल्याने बुधवारी कोर्टात सुनावणी सुरू असताना कविता थेट न्यायाधिशांसमोर उपस्थित झाली आणि तिने ‘साहेब मला न्याय द्या’, असा टाहो फोडला. ८० टक्के भाजलेली अग्निदग्धा न्यायालयासमक्ष येऊन न्याय मागत असल्याने न्यायमूर्ती संतोष कुर्वे हेदेखील काहीसे गहिवरले. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना व संरक्षण अधिकारी आसोले यांना महिलेची विशेष काळजी घेऊन तिच्यावर उपचार करण्याचे निर्देश दिलेत.
८० टक्के भाजलेल्या कविताच्यावतीवे तिची लहान बहीण सुरेखा वासुदेव कस्तुरे हिने न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण दाखल केले आहे. न्यायालयाने या प्रकरणात ३१ मार्च २०१५ रोजी अंतरिम खावटी खर्च म्हणून कविताला ५ हजार रूपये द्यावेत, असे आदेश कविताचा पती मथुराप्रसाद रामाधार पटोरकर, जाऊ गीता इसुनाथ पटोरकर, भावसासरा गोपीनाथ पटोरकर, राधा गोपीनाथ पटोरकर यांना दिले होते. दरम्यानच्या काळात कविताच्या पतीला मध्यप्रदेश पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली होती.
तुरूंगातून सुटून आल्यानंतर त्याने न्यायालयात दाखल प्रकरणात मंजूर झालेला खावटीचा अर्ज रद्द करून प्रकरण नव्याने चालविण्याबाबत अर्ज केला होता. मात्र, आपल्या गरीब आई-वडिलांकडे राहून उपचार घेणे शक्य नसल्याने कविता स्वत:च भाजलेल्या अवस्थेत न्यायालयात हजर झाली आणि तिने न्यायाची मागणी केली. हा प्रकार पाहून उपस्थितांचे काळीज हेलावले. (तालुका प्रतिनिधी)