'व्हच्यरुअल' कॅम्पसद्वारे रोजगाराच्या संधी
By Admin | Updated: September 8, 2014 00:59 IST2014-09-08T00:59:09+5:302014-09-08T00:59:09+5:30
मागील काही दिवसांत निर्माण झालेले मंदीचे सावट आता हळूहळू दूर व्हायला लागले आहे; परंतु असे आशावादी चित्र असतानाही कंपन्यांना ...

'व्हच्यरुअल' कॅम्पसद्वारे रोजगाराच्या संधी
अमरावती : मागील काही दिवसांत निर्माण झालेले मंदीचे सावट आता हळूहळू दूर व्हायला लागले आहे; परंतु असे आशावादी चित्र असतानाही कंपन्यांना लागणारे मनुष्यबळ विकसित करण्यात महाविद्यालये कुठेतरी मागे पडत आहेत. याचाच फायदा घेत काही प्लेसमेंट एजन्सीधारकांनी नवे अभ्यासक्रम विकसित केले आहेत.
मात्र, या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बक्कळ पैसे मोजावे लागतात, जे सर्वांना परवडत नाही. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातच असे अभ्यासक्रम शिकविल्यास हा खर्च वाचू शकतो. हीच बाब लक्षात घेऊन शहरातील काही महाविद्यालयांनी 'व्हच्यरुअल कॅम्पस'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
'व्हच्यरुअल कॅम्पस' म्हणजे नेमके काय, यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न.
मनुष्यबळ विकसित करा
१९९७ च्या सुमारास 'व्हच्यरुअल कॅम्पस' ही संकल्पना उदयास आली. कंपन्यांना लागणारे मनुष्यबळ विकसित करण्यासाठी याचा उपयोग होत होता. 'व्हच्यरुअल कॅम्पस'च्या माध्यमातून अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कंपनीत काम करण्याच्या पद्धती व तेथील व्यवस्थापन, सोयी, सुविधा, बाजारात असलेली ब्रॅडिंग याबाबतही माहिती देण्यात येते. तीन किंवा चार वर्षांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय शिकविले जातात. 'व्हच्यरुअल कॅम्पस'च्या माध्यमातून चारही वर्षांत शिकविलेल्या सर्व विषयांची उजळणी केवळ काही मिनिटांत करता येणार आहे. महाविद्यालयनिहाय व सर्व महाविद्यालयांसाठीदेखील यात वेगवेगळी सोय करण्यात आली आहे.
काय आहे 'व्हच्यरुअल कॅम्पस?'
कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जातात. सुरुवातीला 'कॅम्पस प्लेसमेंट'ची क्रेझ असल्याने अनेक कंपन्यांनी युवकांना रोजगार प्रदान केले. मात्र, कंपन्यांना यातून निराशाच हाती लागली. परिणामी, कॅम्पसचे ग्लॅमर ओसरले. यामागे जागतिक मंदीचे कारण जरी सांगण्यात आले असले तरी ते काही शंभर टक्के खरे नाही. कंपन्यांना हवे असलेले मनुष्यबळ मिळत नसल्याने कंपन्यांचा तोटा वाढू लागला.
यावर तोडगा काढण्यासाठीच 'व्हर्च्युअल कॅम्पस' ही संकल्पना तयार करण्यात आली आहे. यानुसार महाविद्यालयात प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्यांना लागणारे मनुष्यबळ विकसित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. 'व्हच्यरुअल कॅम्पस' विद्यार्थी, महाविद्यालये व कंपनी या तिघांसाठी उपयोगी ठरले आहे. 'व्हच्यरुअल कॅम्पस'च्या माध्यमातून कंपन्यांना हवे असणारे मनुष्यबळ विकसित करता येईल.
शहरात भरपूर संधी
शहरात लवकरच डीएमआयसी प्रकल्प सुरू झाल्यास अनेकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहे. या कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे.
येणाऱ्या काळात सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, मेंटेनन्स, आऊटसोर्सिंग, बीपीओ या कंपन्या भरभराटीस येतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. एवढेच नाही तर प्रत्येक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना येथे रोजगार मिळणार असल्यामुळे बाहेर देशात जाणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल. विद्यार्थी व शिक्षकांना लाभदायक
देशातील महाविद्यालये व विद्यापीठांतून कंपन्यांना पाहिजे तेवढे मनुष्यबळ मिळत नाही. त्यामुळे आता कंपन्या स्वत:च नवे अभ्यासक्रम तयार करण्यास प्राधान्य देत आहेत. हे अभ्यासक्रम देशातील काही महाविद्यालयांतून शिकविले जातात. विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या काही महाविद्यालयांसोबत 'व्हच्यरुअल कॅम्पस'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान केले जाते. 'व्हच्यरुअल कॅम्पस' महाविद्यालयात सुरू करून त्याचा फायदा विद्यार्थी व तेथील शिक्षकांनादेखील मिळू शकेल.
कंपनीनिहाय स्किल सेट
देशभरातील शेकडो महाविद्यालयांत या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. शिक्षकांनादेखील याचा फायदा होतो. ज्या महाविद्यालयात नवीन स्टाफ आहे किंवा शिक्षकांची कमतरता आहे, अशा महाविद्यालयातदेखील हे प्रभावी ठरले आहे. कंपन्यांना लागणारे नेमके कौशल्य यातून मिळते. शिवाय कंपनीच्यावतीने आयोजित केलेल्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाल्याने विद्यार्थ्यांना भावी जीवनात याचा फायदा होतो.