ज्वेलर्स व्यावसायिकाचा मुलगा निघाला हत्यारा
By Admin | Updated: November 2, 2014 22:25 IST2014-11-02T22:25:59+5:302014-11-02T22:25:59+5:30
धनराज लाईन परिसरातील मंदिराजवळ गुरुवारी रात्री ११ वाजतादरम्यान २२ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला शनिवारी रात्री अटक केली.

ज्वेलर्स व्यावसायिकाचा मुलगा निघाला हत्यारा
अमरावती : धनराज लाईन परिसरातील मंदिराजवळ गुरुवारी रात्री ११ वाजतादरम्यान २२ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला शनिवारी रात्री अटक केली. हा अल्पवयीन आरोपी ज्वेलर्स व्यावसायिकाचा मुलगा असल्याचे सांगण्यात येते.
सराफा बाजार परिसरातील धनराज लाईनजवळ गुरुवारी रात्री राजा ऊर्फ सैयद जावेद सैयद हमीद (२२, रा. मोमिनपुरा, बडनेरा) हा युवक गंभीर जखमी अवस्थेत खोलापुरी गेट पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी जखमीला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. मृताच्या छातीवर व खाद्यांवर धारदार शस्त्राचे वार केल्याचे आढळून आल्याने याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीवरुन राजा उर्फ सैयद हा गुरुवारी रात्री सक्करसाथ परिसरातील हनुमान मंदिराजवळ निखील नावाच्या मित्रासोबत बसलेला होता. रात्री १०.३० वाजता सुमारास भाजीबाजार परिसरातील रहिवासी अल्पवयीन आरोपीने राजा व निखील यांच्याशी वाद घालून हाणामारी केली होती. यावेळी आरोपीने जवळील चाकू काढून राजा उर्फ सैयदवर हल्ला केला होता. यामध्ये राजा गंभीर जखमी झाला होता. घटना घडताच राजाला जखमी अवस्थेत पाहून त्याचा मित्र निखील याने तेथून पळ काढला होता. या प्रकरणाच्या चौकशीत शुक्रवारी पोलिसांनी निखील याला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत निखीलने सर्व घटनाक्रमाचा खुलासा पोलिसासमोर केला. त्या अनुशंगाने पोलिसांनी शनिवारी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. अल्पवयीन आरोपी हा येथील एका सुवर्णकार व्यवसायिकांचा मुलगा आहे. तसेच लुटमारीच्या अनुशंगाने राजावर हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीजवळून हत्येच्या वेळीचे कपडे व चाकू जप्त केला आहे.