जीप जात नाही, ट्रक गेला कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 23:55 IST2016-07-23T23:55:18+5:302016-07-23T23:55:18+5:30

पालकमंत्र्यांच्या उलटतपासणीने ठाणेदार घामाघूम : एसपीची कानउघाडणी, दोन तासात मागविला सीडीआर

Jeep is not going, how did the truck go? | जीप जात नाही, ट्रक गेला कसा?

जीप जात नाही, ट्रक गेला कसा?

पालकमंत्र्यांच्या उलटतपासणीने ठाणेदार घामाघूम : एसपीची कानउघाडणी, दोन तासात मागविला सीडीआर
अमरावती : माझा ताफाच काय, तर साधी जीप या ठिकाणावरून जाण्यास अडथळा होत असतांना दहाचाकी ट्रक शहरात दाखल झालाच कसा? अशा सवाल पालकमंत्र्यांनी केला. त्यावर चांदूरबाजारचे ठाणेदार घामाघूम झालेत. पालकमंत्र्यांच्या आक्रमकतेसमोर ठाणेदारांची बोबडी वळली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी थेट ठाणेदाराच्या ‘कॉलडिटेल्स’ एसपींकडून मागवल्याने पोलिस यंत्रणा हादरुन गेली आहे.
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी दुपारी चांदूरबाजार गाठून अपघातात बळी पडलेल्या इंगळे कुटूंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांचा ताफा चांदूरबाजारातील मुख्य चौकात पोहोचला. पालकमंत्रीच चौकात आल्याने स्थानिक पोलिसांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासाठी आॅटो व अन्य वाहनांना रस्त्याच्या बाजूला केले. त्याचवेळी पालकमंत्री वाहनाबाहेर पडले व कुठल्याच वाहनांना न हटवता ज्या वाहनांना हटविले त्यांना पुन्हा तेथेच लावण्याच्या सूचना दिल्या. ठाणेदार अजय आखरे यांना पालकमंत्र्यांनी बोलावून घेतले. वर्दळीच्या या ठिकाणावरुन माझ्या ताफ्यातील वाहने सुरक्षितपणे कुणालाही न हटवता जाणे शक्यच नाही, तर गायींची अवैध वाहतूक करणारा दहाचाकी ट्रक पुढे पोहचलाच कसा? असा सवाल पालकमंत्र्यांनी आखरेंना विचारला. पालकमंत्री संतापाने लालबुंद झाले असतांना ठाणेदार व त्यांची यंत्रणा गपगार झाली होती. ज्या मार्गाने तो ट्रक शहरात दाखल झाला त्या सर्व मार्गांची पालकमंत्र्यांनी पाहणी केली व अपघात कसा घडला असावा, याचे प्रात्यक्षिकच केले. (प्रतिनिधी)

ठाणेदाराचे कॉल डिटेल्स मागविले
ज्या वर्दळीच्या ठिकाणावरुन गुरांची वाहतूक करणारा तो ट्रक पुढे खरवाडीला गेला त्या सर्व रस्त्यांची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री चांदूरबाजार ठाण्यात पोहोचले. ज्या-ज्या वेळी गुरांची अवैध वाहतूक करणारे ट्रक शहराच्या विशिष्ठ भागातून जातात. त्यावेळी पोलिसांकडून तो मार्ग मोकळा केल्या जातो, असा आरोप नागरिकांनी केला. त्या आधारे पालकमंत्र्यांनी ठाणेदार अजय आखरे यांचे मागील दोन महिन्यांचे कॉल डिटेल्स दोन तासात देण्याचे आदेश एसपींना दिलेत.

एफआयआरची तपासणी
२० जुलैला गुरांची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या दहा चाकी ट्रकने इंगळे कुटूंबातील तिघांचा बळी घेतला. या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी शनिवारी या गुन्ह्यातील एफआयआरची तपासणी केली. तो ट्रक जात असतांना चालकाने ठाणेदारांंशी संपर्क साधला का?हे तपासण्यासाठी थेट ठाणेदारांचेच कॉलडिटेल्स मागविल्याने यंत्रणेची बोलतीच बंद झाली होती. अजय आखरे यांच्यासह महसूल यंत्रणेलाही पालकमंत्र्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले.

इंगळे कुटुंबीयांचे सांत्वन
बेधुंद ट्रक चालकाने खरवाडीनजिक इंगळे यांच्या चार चाकी वाहनाला धडक दिली. या अपघातात किशोर-शिल्पा या दाम्पत्यासह चिमुकल्या शौर्य इंगळेचा करुण अंत झाला. पालकमंत्र्यांनी शनिवारी त्यांचे घर गाठून शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास दिला. तथा किशोर इंगळे यांच्या वृद्ध आईचे व चिमुकल्या सुजलचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी खरवाडी येथे घटनास्थळाची पाहणी करुन अपघाताची नेमकी वस्तुस्थिती जाणून घेतली.

पालकमंत्र्यांनी चांदूरबाजारच्या ठाणेदाराचे कॉलडिटेल्स रिपोर्ट मागविला आहे. तथापि सोमवारी सीडीआर देणे शक्य होईल. कॉल डिटेल्स चौकशीचाच एक भाग आहे.
- लखमी गौतम,
पोलिस अधीक्षक

Web Title: Jeep is not going, how did the truck go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.