जयश्रीचा आधारवडही कोसळला, उषा कुऱ्हाडेंचा ह्यदयविकाराने मृत्यू
By Admin | Updated: August 17, 2016 00:02 IST2016-08-17T00:02:12+5:302016-08-17T00:02:12+5:30
लाडक्या लेकीचा सासरच्या मंडळीने केलेली दुर्दशा पाहून ती माऊली खचली होती.

जयश्रीचा आधारवडही कोसळला, उषा कुऱ्हाडेंचा ह्यदयविकाराने मृत्यू
अमरावती : लाडक्या लेकीचा सासरच्या मंडळीने केलेली दुर्दशा पाहून ती माऊली खचली होती. मुलीची प्रकृती सुधारत असल्याचे पाहून तिने कसाबसा तग धरला होता. मात्र, जयश्रीला अत्यंत गरज असताना तिच्या आईने जगाचा निरोप घेतला. आता पुन्हा एकदा जयश्री एकटी पडली आहे. सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने उषा कुऱ्हाडे यांचा पारश्री रुग्णालयातच मृत्यू झाला आणि जीवनाशी झुंज देणारी जयश्री पुन्हा डगमगली आहे.
कुऱ्हा येथील माहेरवासिनी जयश्री दुधे हिच्यावर माहूर येथील सासरच्या मंडळीने अन्नपाण्याविना एका अंधाऱ्या खोलीत डांबून अत्याचार केले. तिच्या अत्याचाराला 'लोकमत'ने वाचा फोडल्यानंतर अनेक हात मदतीला सरसावलेत. तिच्यावर प्रथम इर्विन रुग्णालयात उपचार झाला. त्यानंतर पारश्री रुग्णालयाचे डॉ.श्रीगोपाल राठी यांनी तिला उपचारासाठी दत्तक घेतले. जयश्रीवर योग्य उपचार सुरू झाल्याने तिची शुगर आटोक्यात येऊन तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. दरम्यान रुग्णालयात जयश्रीची काळजी घेण्यासाठी तिची आई उषा कुऱ्हाडे घेत होती. दररोज आ.यशोमती ठाकूर यांचे कार्यकर्ते जयश्री व तिच्या आईची आत्मीयतेने चौकशी करायचे. त्यामुळे दोघींनाही मोठा आधार मिळाला. मात्र, तरीसुद्धा मुलीवरील अत्याचार व तिच्या पुढील जीवनाची चिंता उषा कुऱ्हाडे यांना संतावतच होती. या काळजीमुळे तिची आई नेहमीच चिंताग्रस्त राहत होती. दरम्यान तीन दिवसांपूर्वी उषा यांचीही प्रकृती बिगडल्याने त्या कुऱ्हा गेल्या. मात्र, मुलगी रुग्णालयात एकटीच आहे, या चिंतेत ती होती. त्यामुळे तीने पुन्हा जीवाची चिंता न करीत जयश्रीची देखभाल करण्यासाठी रुग्णालयात आली. मात्र, सोमवारी सकाळी अचानक उषा कुऱ्हाडेंच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. ही बाब तेथील परिचारिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ डॉ. राठी यांना बोलावले. राठी यांनी तत्काळ उषाबाईवर उपचार सुरू केले. मात्र, काही वेळानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. आईचे निधन झाल्याचे जयश्रीला कसे सांगायचे, असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. मात्र, जयश्रीची समजूत घालत डॉक्टरने जड अंतकरणाने तिला सांगितले. आई गेल्याचे कळताच जयश्रीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा निघाल्या. काही वेळात जयश्रीच्या बहिणी माधुरी दुधे (बडनेरा), मेघा दारोकार (आर्वी) व सुनंदा पोकळे (बडनेरा) या रुग्णालयात पोहोचल्या. त्यांनीही जयश्रीचा आधार देत धीर दिला. सायंकाळी उषाबार्इंचे पार्थिव कुऱ्हा येथे नेऊन त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
आ. ठाकूर यांनी दिला जयश्रीला धीर
जयश्रीच्या आईचे निधन झाल्याचे कळताच आ.यशोमती ठाकूर यांनी पारश्री रुग्णालय गाठले. त्यांनी डॉ.श्रीगोपाल राठी यांच्याशी चर्चा करून जयश्रीच्या वडिलांना धीर दिला. त्यानंतर जयश्रीचे भेट घेतली. तुझी काळजी आम्ही घेऊ, तू लवकर बरी हो, असे सांत्वन केले असता जयश्रीच्या डोळ्यातून अश्रू तरळले. यावेळी अनिकेत देशमुखसह पं. स. सदस्य मंगेश भगोले, प्रदीप पचलोरे, संतोष धुमाळे, अमोल बंगरे, रणजित सपाटे, प्रदीप दमाय, अमोल कुऱ्हाडे उपस्थित होते. सायंकाळी उषा कुऱ्हाडे यांच्या पार्थिवावर कार्यकर्त्यांच्या मदतीने अत्यसंस्कार करण्यात आला.