जयंतीदिनीही शिक्षणमहर्षींचा ‘तो’ पुतळा उपेक्षित
By Admin | Updated: December 28, 2016 01:32 IST2016-12-28T01:32:30+5:302016-12-28T01:32:30+5:30
जिल्ह्याभरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा ११८ वा जयंत्युत्सव मंगळवारी साजरा झाला.

जयंतीदिनीही शिक्षणमहर्षींचा ‘तो’ पुतळा उपेक्षित
वैभव बाबरेकर अमरावती
जिल्ह्याभरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा ११८ वा जयंत्युत्सव मंगळवारी साजरा झाला. बहुजनांसाठी शिक्षणची कवाडे खुली करून देण्यासाठी अपरंपार कष्ट घेणाऱ्या या तत्त्ववेत्त्याला सर्व स्तरातून आदरांजली वाहिली जात असताना गाडेगनगरस्थित महापालिका शाळेतील भाऊसाहेबांचा अर्धाकृती पुतळा मात्र जयंतीदिनीही उपेक्षित राहिला. दारूच्या रिकाम्या बाटल्या, पुतळ्याच्या सभोवताल पसरलेला कचरा इतकेच नव्हे तर पुतळ्याच्या दर्शनीभागावर साचलेला मातीचा थर तात्पुरता हटवून फुलांचा एक हार या पुतळ्याच्या गळ्यात घालण्याचे सौजन्य शाळाप्रशासनाने दाखविले नाही, हे विशेष.
बहुजन समाजासाठी शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्याकरिता जीवाचे रान करणाऱ्या या थोरपुरूषाच्या कार्याचा तोंडदेखला गौरव करण्याचे भानही चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या या शाळेला राहू नये, यापेक्षा अधिक दुर्देव ते कोणते?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. २७ डिसेंबर हा डॉ. भाऊसाहेब देशमुख यांचा जन्मदिन. शिक्षणक्षेत्रातील त्यांचे कार्य वादातित आहे. त्यामुळेच जिल्हाभरातच नव्हे तर विदर्भात त्यांचा जयंत्युत्सव थाटात साजरा होतो. मात्र, गाडगेनगरातील महापालिकेची उच्च प्राथमिक मुला-मुलींची शाळा मात्र याला अपवाध ठरली. सन १९६३ साली स्थापन झालेल्या या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे विद्यार्थी शिक्षण घेतात.
पुतळ्याजवळच रंगतात मद्यपार्ट्या
महापालिकेच्या या शाळेला सरंक्षण भिंत नसल्यामुळे आवारात वराह व श्वानांचा मुक्तसंचार असतो. सरंक्षण भिंतीअभावी शाळा परिसरात कोणही ये-जा करू शकतो. पुतळ्याच्या भोवताल आढळलेल्या दारुच्या बाटल्यांवरून येथे दररोज रात्री दारूच्या पार्ट्या रंगत असाव्यात, याची खात्री पटते. मात्र, मुख्याध्यापकांसह कोणीही यागंभीर प्रकाराकडे आजवर लक्ष दिल्याचे दिसत नाही. शाळेच्या इमारतीचीही प्रचंड दुर्दशा झाली आहे.