जमील कॉलनीत शिरला तडस
By Admin | Updated: July 27, 2015 00:29 IST2015-07-27T00:29:48+5:302015-07-27T00:29:48+5:30
वलगाव मार्गावरील जमील कॉलनीत रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास तडस शिरल्याने खळबळ उडाली.

जमील कॉलनीत शिरला तडस
नागरिकांची गर्दी : वनविभागाने चालविले रेस्क्यू आॅपरेशन
अमरावती : वलगाव मार्गावरील जमील कॉलनीत रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास तडस शिरल्याने खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाने तत्काळ घटनास्थळी ‘रेस्क्यू’ आॅपरेशन करून तडशाला ताब्यात घेतले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. हा प्रकार बघण्याकरिता तब्बल पाच हजार नागरिकांनी गर्दी केली होती.
नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमील कॉलनीतील नालीत दडून बसलेला एक विशाल वन्यप्राणी नागरिकांना आढळून आला. हा तडस असल्याचे लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली. काही वेळ हा प्राणी पट्टेदार वाघ असल्याची अफवा पसरल्याने वातावरण अधिकच भीतीदायी झाले होते. काही वेळातच चार ते पाच हजार नागरिकांनी वन्यप्राण्याला बघण्यासाठी गर्दी केली होती. याची माहिती नागरिकांनी नागपुरी गेट पोलीस व वनविभागाच्या नियंत्रण कक्षाला दिली. पोलीस व वनविभागाचे शिकारी प्रतिबंधक पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. वनविभागाने जाळी व पिंजऱ्याच्या सहाय्याने तडशाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो नालीत दडून बसल्याने अडचण निर्माण झाली होती. अखेर वनविभागाने रेस्क्यू आॅपरेशन चालवून तडशाला ट्रँग्यूलाईज (इन्जेक्शन मारून) करून डॉटने बेशुध्द केले. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तडशाला जंगलात सोडले.
‘त्या’ तडशाला चिरोडी जंगलात सोडले
तडस या वन्यप्राण्याला वनविभागाच्या रेस्क्यू आॅपरेशन चमुने सुरक्षितपणे जेरबंद करुन चिरोडी जंगलात सोडण्याची कार्यवाही रविवारी पार पडली. वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप लाकडे, वनरक्षक गावनेर, वहाब, पशु वैद्यकीय अधिकारी गोऱ्हे, विशाल बनसोड, नांदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
वन्यप्रेमींनी हाताळली परिस्थिती
अमरावतीत बिबट अनेकदा आढळला. मात्र दाट वस्तीत तडस पहिल्यांदाच आढळून आला आहे. जमील कॉलनी येथील वर्दळीच्या ठिकाणी नालीत तो दडून बसल्याने नागरिकांची त्रेधा उडाली. मात्र, वनविभागाचे कर्मचारी उशिरा पोहोचल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वनविभागाचे कर्मचारी पोहोचेपर्यंत वन्यजीव प्रेमींनीच नियंत्रणाबाहेर जाणारी परिस्थिती हाताळली. यामध्ये पक्षी अभ्यासक यादव तरटे, विशाल बनसोड, राघवेंद्र नांंदे, गौरव कडू, अंगद देशमुख, स्वप्निल सोनोने, श्रावण देशमुख, मंगेश डाखोरे आदी वन्यजीवप्रेमी उपस्थित होते.
शिकारी प्रतिबंधक पथकाचे रेस्क्यू आॅपरेशन
शिकारी प्रतिबंधक पथकातील अमोल गावनेर, पी.टी. वानखडे, शेख वाहब, फिरोज खान, वीरेंद्र उज्जैनकर, सतीश उमक, मनोज ठाकूर व वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के. लाकडे यांच्या पथकाने तडशाला पकडण्याचे प्रयत्न केला. मात्र, नालीत दडलेला तडस हाती लागत नव्हता. त्यामुळे अमोल गावनेर यांनी रेस्क्यू आॅपरेशन केले.
डुकराची शिकार
वन्यप्राणी तडस पहाटेच लोणटेक जंगलातून जमील कॉलनीपर्यंत आला असावा, त्या भागात डुकरांची संख्या अधिक असल्यामुळे शिकारीच्या शोधात तडस तेथे आला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. नालीत दडून बसलेल्या तडशाजवळच एक अर्धवट खाललेले डुक्कर मृतावस्थेत आढळून आले. त्यामुळे तडशाने डुकराची शिकार केल्याचे निदर्शनास आले आहे.