जामगावात आग, सात घरे बेचिराख
By Admin | Updated: April 14, 2016 00:04 IST2016-04-14T00:04:35+5:302016-04-14T00:04:35+5:30
जामगाव (खडका) येथील झोपडपट्टी परिसरात बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.

जामगावात आग, सात घरे बेचिराख
वरूड तालुक्यातील घटना : महिलांसह चिमुरडे बेघर, लाखोंची हानी
वरूड : जामगाव (खडका) येथील झोपडपट्टी परिसरात बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये सात घरांची राखरांगोळी झाली. त्यामुळे सात कुटुंब उघड्यावर आले असून १० लाखांची हानी झाल्याचा अंदाज आहे.
वरुड, मोर्शी, शेंदूरजनाघाटच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. शर्थीच्या प्रयत्नानंतर ही भीषण आग आटोक्यात आली. जामगाव (खडका) येथे अचानक झोपडपट्टी परिसरात आग लागली. ग्रामस्थांनी आगीची महिती बेनोडा पोलिसांना दिली. त्यानंतर वरुड आणि शेंदूरजनाघाट नगरपरिषद तसेच मोर्शी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. परंतु तोपर्यंत सातही घरांची राखरांगोळी झाली होती. या घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असली तरी प्राणहानी मात्र टळली.
बेघर झालेल्या कुटुंबांमध्ये देवराव मंगल कुडसिंगे, देवल हरिसिंग उईके, वासुदेव श्रीराम वाढिवे, सेवाराम मंगल कुडसिंगे, लीलाबाई सुखदेव तिडगाम, रामदास बाजी धुर्वे, बाजी तिरकाम धुर्वे यांचा समावेश आहे. घटनास्थळावर नायब तहसीलदार कमलाकर देशमुख, बेनोडा पोलिसांचे पथक, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी तसेच सामाजिक कार्यकतेर् नरेंद्र चोरे, सरपंच महेंद्र भुजाडे, उपसरपंच, ग्रामसदस्यांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझविली.
या आगीत सातही घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. ग्रामस्थांनी वर्गणी करुन सात हजार रूपयांची रक्कम अग्निग्रस्तांना दिली. महसूल विभागासह ग्रामपंचायतीने एका हॉलमध्ये राहण्याची तात्पुरती व्यवस्था करून धान्य दिले. सेवाभावी संस्थाना आवाहन करुन या अग्निपीडितांना मदत करण्याचे आवाहन केले. वेळेवर अग्निशमन दल वेळेवर पोहोचले नसते तर मोठा अनर्थ घडला असता. महसूल विभागाच्यावतीने सर्व अग्निपीडितांना तातडीची प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत देण्यात येणार असून लोकसहभागातून या कुटुंबांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे नायब तहसीलदार कमलाकर देशमुख यांनी सांगितले. या अग्निकांडांमुळे परिसरात खळबळ उडाली होती. गावकऱ्यांनी पुढे येऊन या आदिवासी कुटुंबांना मदत दिली. शासनाने या अग्निपीडितांना तातडीची मदत देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिधीनी)