‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:36 IST2018-02-20T00:34:35+5:302018-02-20T00:36:18+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अंबानगरीत जय भवानी, जय शिवाजी, असा जयघोष सोमवारी करण्यात आला. ठिकठिकाणी विविध कार्यक्रम, दुचाकी रॅली व भगवे फेटे बांधून युवकांनी जल्लोष केला.

‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष!
आॅनलाईन लोकमत
अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अंबानगरीत जय भवानी, जय शिवाजी, असा जयघोष सोमवारी करण्यात आला. ठिकठिकाणी विविध कार्यक्रम, दुचाकी रॅली व भगवे फेटे बांधून युवकांनी जल्लोष केला. येथील शिवटेकडीवर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवजयंती उत्सव समिती व महापालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
शहरातील शिवटेकडीवर आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अरविंद गावंडे, प्रमुख वक्ते वामन गवई प्रामुख्याने उपस्थित होते. प्रथम महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला. उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. व्यासपीठावर महापौर संजय नरवणे, मनपा आयुक्त हेमंत पवार, माजी खासदार अनंत गुढे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी , जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे, माजी महापौर वंदना कंगाले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा संगीता ठाकरे, माजी महापौर विलास इंगोले, दिनेश बुब आदी उपस्थित होते. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी भगवे फेटे बांधले होते. विद्यार्थ्यांनीसुद्धा महाराजांची वेशभूषा साकारली. यावेळी अनंत गुढे, अरविंद गावंडे व अविनाश कोठाळे यांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, मराठा सकल मोर्चा, मराठा कुणबी संघटना व इतर सर्व जातीय २१ संघटनांचे पदाधिकारी व काही मुस्लिम बांधवसुद्धा उपस्थित होते. डॉ. अमोल वसू व अनिल टाले यांच्या चमुने रक्तचाप व मधुमेह तपासणी शिबिर घेतले. यावेळी माजी मंत्री यशवंतराव शेरेकर, बाजार समिती संचालक प्रमोद इंगोले, सतीश काळमेघ, संजय ढोरे, उज्ज्वल गावंडे, संजय ठाकरे, मयुरा देशमुख, शीला पाटील, कल्पना वानखडे, तेजस्विनी देशमुख आदी महिला वर्ग उपस्थित होत्या. प्रास्ताविक रणजित तिडके यांनी तर संचालन वर्षा धाबे यांनी केले.
संभाजी ब्रिगेडच्या उत्तम व्यवस्थापनामुळे कोरेगाव-भीमा प्रकरण शमले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रभावित झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या उत्कृ ष्ट व्यवस्थापनामुळे कोरेगाव भीमा दंगलीची धग शमली व त्याची फारसी झळ महाराष्ट्रात पसरली नाही. ते संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेमुळे शक्य झाले, असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे अभ्यासक वामन गवई यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, बाबासाहेब आंबडेकरांनी देशाला दिलेल्या संविधानातील बीज शिवरायांच्या विचारसरणीत आहे. देशाच्या घटनेमध्ये लोकप्रशासनाचे महत्त्व त्यामुळे महाराजांच्या विचारातून प्रतिबिंबीत होते. राज्य घटनेत शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय बाबींचा अंतर्भाव दिसतो.
छत्रपती शिवाजी महाराज मंडळातर्फे शिवजयंती
छत्रपती शिवाजी मंडळ हमालपुरा यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला. यावेळी महेश जाधव, संदीप अगरेकर, रवि जानोळे, गोकुल शिंदे, सागर कांगडे, पिंटू कांगडे, अमर मोरकर, गणेश चव्हाण, विशाल भुते आदी कार्यकर्त्यांनी शिवटेकडीवर शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले
राठी मित्रमंडळाने केला शिवरायांचा जयघोष
राठीनगर मित्र मंडळ व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राठीनगर ते शिवटेकडीपर्यंत दुचाकी रॅली काढली. भगवे झेंडे फडकवित सकाळी ९.३० वाजता कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यापूर्वी जिजाऊ चौकातील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. निखील सगणे, अक्षय भुयार यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.