जबलपूर एक्स्प्रेस सुरु
By Admin | Updated: June 30, 2015 00:33 IST2015-06-30T00:33:17+5:302015-06-30T00:33:17+5:30
मागील काही दिवसांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद करण्यात आलेली अमरावती- जबलपूर एक्स्प्रेस सोमवारपासून पूर्ववत सुरु करण्यात आली आहे.

जबलपूर एक्स्प्रेस सुरु
सोमवारपासून धावली : मध्य प्रदेशात ये-जा करणाऱ्यांची गैरसोय दूर
अमरावती : मागील काही दिवसांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद करण्यात आलेली अमरावती- जबलपूर एक्स्प्रेस सोमवारपासून पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात ये- जा करणाऱ्या प्रवाशांना होत असलेली गैरसोय दूर झाली आहे. बंद नंतर पहिल्यांदाच सोमवारी ही गाडी सुरु झाली असली तरी प्रवाशांची गर्दी नगण्य असल्याचे दिसून आले.
जबलपूर एक्स्प्रेस ही गाडी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वे भुसावळ विभागाने घेताच प्रवाशांना ही बाब धक्का देणारी होती. पंरतु इटारसी येथील संगणकीकृत सिग्नल प्रणाली अचानक जळून खाक झाल्यामुळे सिग्नल प्रणाली पूर्णत: निकामी झाली. परिणामी इटारसीमार्गे जाणाऱ्या बहुतांश गाड्या बंद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा फटका जबलूर एक्स्प्रेस रद्द करण्याला बसला. रेल्वेने जबलपूर एक्स्प्रेस ३० जूनपासून नियमित करण्याचे ठरविले होते. मात्र ही गाडी २९ जूनपासून नियमित सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी ही गाडी वेळेनुसार जबलपूरकडे रवाना झाली. उद्या मंगळवारी ही जबलपूर एक्स्प्रेस सुटणार नसून १ जुलैपासून ही गाडी नियमित सुरु होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. (प्रतिनिधी)
तांत्रिक अडचणी दूर होताच प्रवाशांना सेवा
इटारसी येथील संगणकीकृत सिग्नल प्रणाली जळून खाक झाल्यामुळे रेल्वे अनेक महत्त्वपूर्ण आणि लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याचा प्रसंग प्रशासनावर ओढावला. १५ दिवसांपासून अमरावती- जबलपूर एक्सप्रेस ही गाडी बंद होती. परंतु तांत्रिक अडचणी दूर होताच काही रेल्वे गाड्या सुरु करण्याचा निर्णय रेल्वने घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून जबलपूर एक्स्प्रेस सुरु करण्यात आली आहे. नागपूरमार्गे मध्य प्रदेशकडे जाणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी असल्याने या गाडीचा लाभ होईल.