-असे शिक्षण न घेतलेले बरे !
By Admin | Updated: March 30, 2017 00:04 IST2017-03-30T00:04:47+5:302017-03-30T00:04:47+5:30
आई..बाबा मला मांडीवर घ्या ना.. मला पाणी द्या ना.. केवीलवाणी विनवणी करणारा..प्राणांतिक वेदनांनी तडफडणाऱ्या विजयचा चेहरा डोळ्यांसमोरून हलत नाही.

-असे शिक्षण न घेतलेले बरे !
आईचे अश्रू अनावर : वडिल कोलमडले, गावात शोककळा
सुमित हरकुट चांदूरबाजार
आई..बाबा मला मांडीवर घ्या ना.. मला पाणी द्या ना.. केवीलवाणी विनवणी करणारा..प्राणांतिक वेदनांनी तडफडणाऱ्या विजयचा चेहरा डोळ्यांसमोरून हलत नाही. माझा विजय मला परत आणून द्या हो... असा विजयच्या आईचा हृदय हेलावणारा हंबरडा भल्याभल्यांच्या डोळ्यांना धारा लावतोय. काही लोकांच्या अरेरावीमुळे आणि माणुसकीविरहित वागणुकीमुळे पोटचा गोळा गमावून बसलेल्या या माऊलची समजूत काढावी तरी कशी, हा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय. मातेच्या आक्रोशापुढे गावकरीही हतबल झाले आहेत. मृत विजयची आई पुष्पाबार्इंचे अश्रू थांबत नाहीत. रडताना त्या काही तरी बरळतात. त्या म्हणतात, ‘शाळांमधून दिले जाणारे शिक्षण जर असे प्राणघातक ठरत असेल तर ते न घेतलेलेच बरे’. अश्रुंच्या पाटांसोबत एखाद्या बंदुकीच्या गोळीसारखा येणारा त्यांचा हा प्रश्न उपस्थितांना भेदून जातो.
शेतमजुरी करून आपल्या तीन मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाह करणाऱ्या सुधाकर नांदणे यांच्या कुटुंबावर १५ वर्षीय विजयच्या आत्महत्येने कुठाराघात झाला आहे. विजयच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने रंगविणाऱ्या त्याच्या आई,वडिलांसह मोठ्या भावावर त्याचे कलेवर पाहण्याची वेळ आली. ते देखील अगदीच क्षुल्लक कारणांमुळे. आपल्या चिमुकल्याचा काय गुन्हा होता ज्यामुळे त्याला आत्महत्या करावी लागली, हा प्रश्न विजयच्या माता-पित्यांना व्याकूळ करतोय. शाळेत मुले खेळतात, चिडवितात, त्यांचे वादही होतात. मात्र, यासाठी शिक्षकांनीच विद्यार्थ्याच्या बालसुलभ मानसिकेतचा विचार न करता त्याला वारंवार अपमानित करणे, मारहाण करणे, कितपत योग्य आहे.
‘त्या’माऊलीचे सांत्वन अशक्य
चांदूरबाजार : शिक्षकांच्या या व्यवहाराने व्यथित झालेल्या निरागस विजयला आत्महत्येऐवजी दुसरा मार्गच दिसू नये, इतपत त्याची मानसिकता ढासळतेच कशी?, यासाठी जबाबदार कोण, असे एक ना अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाले आहेत. मात्र, दुर्देवाने हे सर्वच प्रश्न अनुत्तरीत आहेत. शिक्षकी पेशा स्वीकारून विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी स्वीकारलेली माणसे इतकी आत्मकेंद्रीत कशी असू शकतात? म्हणूनच विजयची आई पुष्पा नांदणे यांचे शोकाकूल अवस्थेतील प्रश्न जिव्हारी लागतात आणि अंतर्मुखही करतात. काही लोकांच्या चुकीमुळे माझा मुलगा गेला, अशी तिखट प्रतिक्रिया मृत विजयचे वडील सुधाकर नांदणे यांनी व्यक्त केली. सद्यस्थितीत नांदणे यांच्या घरात शोककळा पसरली आहे. त्यांना धीर देण्याकरिता गावातील लोक पुढे आले आहेत. आई पुष्पा रडता रडता बेशुद्ध होत आहे. आपल्या आसपास काय चालले आहे, याचीही जाणीव त्यांना नाही. वडील सुधाकर नांदणे अंतर्बाह्य हादरले आहेत. गावकरीही नांदणे कुटुंबाच्या दु:खापासून अलिप्त नाहीत. शिक्षणाने माणूस मोठा होतो, त्याची वैचारिक पातळी वाढते. मात्र, चिमुरड्याचा जीव घेणारे प्रकार शिक्षणक्षेत्रात घडत असतील तर ते शिक्षण काय कामाचे, त्यापेक्षा न शिकलेलेच बरे, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांची आहे. शासन एकीकडे आनंददायी शिक्षणासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, याच शिक्षणाने नांदणे कुटुंबाचा आनंदच हिरावलाय. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करावी, अशी मागणी नांदणे कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी केली आहे.