-हे तर प्रशासनाचेच ‘नरबळी’ !
By Admin | Updated: August 7, 2015 00:25 IST2015-08-07T00:25:49+5:302015-08-07T00:25:49+5:30
बिल्दोरी नाल्यावरील पुलावरुन कायम पाणी वाहत असल्याने तो जिवघेणा झाल्याची सर्वंकष कल्पना परिसरातील ग्रामस्थांना आली होती.

-हे तर प्रशासनाचेच ‘नरबळी’ !
मोहन राऊत/राजाभाऊ मनोहरे अंजनसिंगी
बिल्दोरी नाल्यावरील पुलावरुन कायम पाणी वाहत असल्याने तो जिवघेणा झाल्याची सर्वंकष कल्पना परिसरातील ग्रामस्थांना आली होती. हजार विनंत्या केल्यावरही शासनाने दखल घेतली नाही. अखेर अंजनसिंगी, दुर्गवाडा, आलावाडा, धारवाडा येथील ग्रामस्थांनी तब्बल पाच दिवस नाल्यातील पाण्यात ठिय्या देऊन पुलाच्या मागणीसाठी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. प्रशासनाने गावकऱ्यांचा आक्रोश वेळीच ऐकला असता तर आज हे चार मृत्यू कदाचित टाळता आले असते. हा अपघात नव्हे, प्रशासनाने घेतलेले ‘नरबळी’च होय, असा तीव्र संताप परिसरातील गावकऱ्यांनी म्हणूनच व्यक्त केला.
पालक सचिवांनी केली होती पुलाची पाहणी
अंजनसिंगी : निम्न वर्धाचे बॅकवॉटर या भागात येत आहे. तेथे योग्य त्या सुविधा दिल्या जातील, असे आश्वासन शासनाने आ. यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर विधानसभेत दिले होते. शेतकऱ्यांनी ५ दिवस पूलाच्या पाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केले. आ. ठाकूर यांनी अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभागाच्या नागपूर कार्यालयात या पुलाच्या मंजुरीसाठी धडक दिली होती. त्या अनुषंगाने जलसंपदाच्या प्रधान सचिव व जिल्ह्याच्या पालक सचिव यांनी या बिल्दोरी पुलाची पाहणी केली होती.
पाण्यामुळे मृत्यू, प्राथमिक अंदाज
चांदूररेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात चारही मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले. पुराचे पाणी कारमध्ये शिरले व हे पाणी शरीरात गेल्याने चौघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक लिना भुतडा यांनी सांगितले.
रपट्यावर नेहमी असते ‘बॅकवॉटर’
बिल्दोरी नाल्यावरील रपट्यानंतर २०० मीटर अंतरावर वर्धा नदीचे मोठे पात्र आहे. या नदीत निम्न वर्धा धरणाचे बॅकवॉटर हे नेहमीच पुलावर असते. मात्र, संततधार पावसामुळे बिल्दोरी नाला ‘ओव्हरफ्लो’ झाला होता. वळण धोकादायक असल्याने ते वाहन चालकाच्या लक्षात येत नाही.
दुर्गवाडा,आलवाडा ग्रामस्थांनी केले होते उपोषण
अंजनसिंगी, दुर्गवाडा, आलावाडा येथील ग्रामस्थांची शेती बिल्दोरी नाल्याच्या दुसऱ्या बाजुला आहे़ ग्रामस्थांना या नदीच्या पात्रातूनच रोज ये-जा करावी लागते. विशेषत: दुर्गवाडा, आलवाडा येथील ग्रामस्थांना आर्वी ही बाजारपेठ असल्यामुळे दर आठवड्याला या नदीच्या पात्रातून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. यवतमाळ, बाभुळगाव, धामणगाव येथून कौंडण्यपूर, आर्वीला जाण्याकरितादेखील हाच मार्ग सोयीस्कर आहे़ त्यामुळेच बिल्दोरी नदीवरील पूल व्हावा, याकरिता दुर्गवाडा व आलवाडा येथील ग्रामस्थांनी आठ महिन्यांपूर्वी पाच दिवस या नाल्याच्या पात्रात बसून उपोषण केले होते़ या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले होते. आ़यशोमती ठाकूर, आ़ वीरेंद्र जगताप, माजी आमदार अरूण अडसड यांच्या मध्यस्थीमुळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले होते़ एक महिन्यात पुलाच्या बांधकामाला मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन त्यावेळी प्रशासनाने दिले होते. इतकेच नव्हे तर गेल्या रविवारी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, तिवसा येथील तहसीलदार विजय लोखंडे यांनी या पुलाची पाहणी केली होती. जीव गेलेत, मात्र निगरगट्ट प्रशासन जागचे हलले नाही.