भावी गाव पुढाऱ्यांना ३१ डिसेंबर जाणार जड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:14 IST2020-12-31T04:14:15+5:302020-12-31T04:14:15+5:30
अमरावती: जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायत निवडणुका १५ जानेवारीला होत आहेत. ३१ डिसेंबर धुमधडाक्यात साजरा होणार असल्याची चिन्हे ...

भावी गाव पुढाऱ्यांना ३१ डिसेंबर जाणार जड
अमरावती: जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायत निवडणुका १५ जानेवारीला होत आहेत. ३१ डिसेंबर धुमधडाक्यात साजरा होणार असल्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने गावोगावचे राजकारण तापू लागले आहे.
डिसेंबर एन्ड हा तसा तळीराम व खवय्यांच्यासाठी पर्वणीच असतो. यात भरीस भर म्हणजे यंदाच्या ३१ डिसेंबरला निवडणुकांची किनार आहे . त्यामुळे बोलायलाच नको अशी परिस्थिती असणार आहे. पार्ट्यांमध्ये रमणाऱ्या मतदारांसाठी ही संधी असली तरी हा ३१ डिसेंबर उमेदवारांचा घाम काढणारा ठरेल. एरवी निवडणुका म्हटले की हॉटेल व ढाब्यावर मोठी गर्दी पाहायला मिळत असते. डिसेंबर जोरात होणार असल्याने हॉटेल व ढाबा मालकांनी त्यादृष्टीने तयारी ठेवली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हॉटेल व ढाब्यांमध्ये कार्यकर्त्यांची रेलचेल दिसून येत आहे. निवडणुका त्यात थर्टी फर्स्टमुळे पार्ट्यांच्या माध्यमातून मोठ्या उलाढाली होणार असल्याचे दिसते. सर्वसाधारण आरक्षण असणाऱ्या गावात निवडणुकीची मोठी चुरस असणार आहे. त्यामुळे तळीराम व खवय्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. काही उमेदवार ढाब्यावर जेवण देण्यापेक्षा घरी किंवा शेतात बेत आखत आहेत. सध्या गावोगावच्या यात्रा-जत्रा कोरोनामुळे रद्द झाल्याने खवय्ये जेवणावळीला मुकले आहेत. अशातच ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागात राजकीय व्यूहरचना आखण्यासाठी थर्टी फर्स्टचा दिवस निवडला आहे. परिणामी यामुळे भावी पुढाऱ्यांनाही याकरिता आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
बॉक्स
कोरोनाचे भान हवे
कोरोनाच्या काळात भान ठेवून निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे निवडणूक चार दिवसांनी होईल मात्र कोरोनाचा संसर्ग झाला तर जीवाला मुकावे लागून कुटुंबाची वाताहत होऊ शकते, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.