जागतिक पर्यावरण दिन : दिनेशकुमार त्यागी यांचे प्रतिपादनअमरावती : लोकांमध्ये पर्यावरणाविषयक जागृती करणे गरजेचे आहे. लोकांना पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाचे महत्व समजावून दिले तर पुढच्या काळात पर्यावरणाचा समतोल राखता येईल, असे प्रतिपादन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक, क्षेत्र संचालक दिनेश त्यागी यांनी केले.मध्यवर्ती रोपवाटिका, वडाळी वनपरिक्षेत्र येथे वन विभागामार्फत शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिन पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक दिनेशकुमार त्यागी होते. प्रमुख अतिथी म्हणून विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य सीईओ अनिल भंडारी, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, उपवनसंरक्षक निनू सोमराज, उपवनसंरक्षक घुले, स्वप्नील सोनोने उपस्थित होते. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी लोकांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे, असे त्यागी म्हणाले. हवा, पाणी, अग्नी, जमीन व आकाश या पंचतत्त्वांचे ंरक्षण करुन पर्यावरणाचे संरक्षण करता येते. प्रदूषणामुळे पर्यावरणाला अधिक हानी पोहोचत आहे, हे प्रमाण कमी करुन आपण पर्यावरणाचे संवर्धन तसेच संरक्षण करु शकतो. प्लास्टिक नाशवंत नसल्याने प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणावर परिणाम होतो. प्लास्टिकचा वापर कमी करुन पर्यावरणाला मोठा फायदा मिळू शकतो, असेही त्यागी म्हणाले. कार्बनडाय आॅक्साईडचे प्रमाण कमी करण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे झाड लावणे व ते जगवणे. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुकर म्हणाले की, हवा, पाणी, वनस्पती व माणूस यासर्व बाबींनी पर्यावरण तयार होते. लोकसंख्यावाढीमुळे पर्यावरणाची समस्या निर्माण झाली आहे. उत्तराखंडातील अतिवृष्टी हे पर्यावरण असंतुलनाचे एक मोठे उदाहरण आहे. सण, उत्सव निसर्गाला पूरक असणे आवश्यक आहे. पर्यावरणाला अनुसरुन सण साजरे केले पाहिजे, जेणेकरुन पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. नागरिकांच्या व वन्यप्रेमींच्या मदतीने परिसरात झाडे लावावीत. जिल्हाधिकारी किरण गित्ते म्हणाले की, भारत हा ऋतुंचा देश आहे. त्यामुळे तापमान नेहमी बदलत राहाते. पर्यावरणाच्या असमतोलामुळे दुष्काळ, पूर या समस्या निर्माण झाल्या आहेत. जलयुक्त शिवार हे अभियानाचे पहिले सत्र आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे प्रत्येक गावात पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पर्यावरणाला फायदा मिळणार आहे. प्रारंभी वनपाल सलीम यांनी बांबुच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी देशातील व देशाबाहेरील वेगवेगळ्या बांबुच्या रोपांची माहिती उपस्थितांना दिली. प्रास्ताविक उपवनसंरक्षक निनू सोमराज यांनी तर आभार प्रदर्शन उपवनसंरक्षक घुले यांनी केले. सूत्रसंचालन वनपरिक्षेत्र अधिकारी गावंडे यांनी केले. कार्यक्रमासाठी वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप लाकडे व चमुने प्रयत्न केले.
लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती आणणे आवश्यक
By admin | Updated: June 7, 2015 00:27 IST