स्वच्छतेचा मुद्दा गाजला विधिमंडळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:05 IST2017-12-24T00:05:24+5:302017-12-24T00:05:35+5:30
तालुका मुख्यालयी सर्व महत्त्वपूर्ण कार्यालये एकाच इमारतीत रहावे, यासाठी सात कोटींची प्रशासकीय इमारत दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आली. मात्र, या नव्या इमारतीच्या स्वच्छतेसाठी तालुका प्रशासन गंभीर नाही.

स्वच्छतेचा मुद्दा गाजला विधिमंडळात
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : तालुका मुख्यालयी सर्व महत्त्वपूर्ण कार्यालये एकाच इमारतीत रहावे, यासाठी सात कोटींची प्रशासकीय इमारत दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आली. मात्र, या नव्या इमारतीच्या स्वच्छतेसाठी तालुका प्रशासन गंभीर नाही. वारंवार सूचना करूनही नियमित सफाई होत नसल्याने आ. यशोमती ठाकूर यांनी विधिमंडळात हा मुद्दा रेटून धरला.
प्रशासकीय भवनात तिवसा तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक, उपनिबंधकासह अनेक शासकीय कार्यालये आहेत. या इमारतीत सद्यस्थितीत सर्व वॉटरकुलर बंद आहेत. मात्र, अधिकारी व कर्मचारी विकतचे शुद्ध पाणी पिण्यास वापरतात. येथे कामाकरिता आलेल्या नागरिकांना मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी हॉटेलची वाट धरावी लागते. या प्रशासकीय भवनाची नियमित सफाई न केल्याने सर्वत्र धूळ व अस्वच्छता आढळून येते. स्थानिक पदाधिकाºयांनी ही बाब तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. विधिमंडळात चर्चेदरम्यान आ. ठाकुरांनी या मुद्यावर शासनाचे लक्ष वेधले.
तहसीलदार मुख्यालयी राहत नाहीत. प्रशासकीय भवनाच्या स्वच्छता बाबत ते गंभीर नाहीत. त्यामुळे हा मुद्दा मी विधिमंडळात मांडला. स्वच्छ भारत अभियानात हेच अपेक्षित आहे काय?
- यशोमती ठाकूर,
आमदार, तिवसा
आमदारांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून निधी खेचून आणला. तिवस्यात कोट्यवधींची प्रशासकीय इमारत उभारली. येथील स्वच्छतेची बाब गांभीर्याने न घेतल्यास आंदोलनाचा पवित्रा घेऊ.
- वैभव वानखडे,
उपाध्यक्ष, नगरपंचायत