लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा दौऱ्यावर ९ ऑगस्ट रोजी आलेल्या पालकमंत्र्यांनी थेट 'किचन ३६५'मध्ये भेट देत तेथे चहा-नाष्टा घेतला. ज्यांच्या विरोधात समाजातील घटक एकत्र येऊन लढा देत आहेत, ज्यांच्याविरुद्ध पोलिसांचे रात्रंदिवस धाडसत्र सुरू आहे, त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आमचे वर्षातील 'बावन्न' आठवडे आणि '३६५' दिवस प्रोत्साहन असेल, हा संदेश पालकमंत्र्यांना द्यायचा आहे का, असा संतप्त सवाल युवक काँग्रेसने उपस्थित केला आहे.
अमरावती शहर गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांच्या विळख्यात सापडले आहे. विशेषतः शहरातील तरुण पिढी पब आणि बारच्या आहारी जात असून, व्यसनाधीनतेचे प्रमाण चिंताजनक स्तरावर पोहोचले आहे. पोलिस प्रशासनाने अवैध धंद्यांवर लगाम घालण्याकरिता सातत्याने धाडसी मोहीम राबविल्या. मात्र, पालकमंत्री अशा अवैध धंद्यांना संरक्षण देत असतील किंवा त्यांच्या विरोधातील कारवाईला राजकीय अडथळा निर्माण करत असतील, तर अमरावतीच्या रस्त्यावर "जवाब दो" आंदोलन युवक काँग्रेसकडून उभारले जाईल. हे आंदोलन केवळ घोषणांपुरते मर्यादित नसेल, तर आम्ही प्रत्यक्ष कारवाई, जनजागृती आणि आंदोलनाच्या माध्यमातून हा मुद्दा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी नेऊ, असा इशारा शहर युवक काँग्रेसचे समीर जवंजाळ, वैभव देशमुख, अनिकेत ढंगळे, सागर कलाने, योगेश बुंदेले, आशिष यादव, निखिल बिजवे, संकेत साहू आदींनी एका पत्राद्वारे दिला आहे. उद्धवसेनेचे शहराध्यक्ष प्रवीण हरमकर, प्रहारचे शहराध्यक्ष बंटी रामटेके, माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांनीसुद्धा पालकमंत्र्यांच्या भूमिकेचा विरोध केला आहे. दरम्यान, पालकमंत्र्यांना त्या प्रतिष्ठानात घेऊन जाणाऱ्या संबंधिताची कानउघाडणी झाली आहे. ती खुद्द पालकमंत्र्यांनीच केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
'३६५' च्या संचालकानेच केले फोटो व्हायरलपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्या रेस्टॉरंटला भेटीसाठी आले असता, त्यांचे स्वागत केल्यानंतरचे फोटो '३६५'च्या संचालकांनीच स्वतः सोशल मीडियावर व्हायरल केल्याची बाब उघडकीस आली आहे. नेमके यातून रेस्टॉरंटच्या संचालकांना कोणता संदेश द्यायचा होता, याविषयी आता चर्चा रंगू लागली आहे.
पोलिस यंत्रणेच्या आत्मसन्मानावर हा आघातचएकीकडे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी स्वतःच्या प्रतिष्ठेचा आणि कर्तव्याचा सवाल मानून अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई करीत आहेत. दुसरीकडे सत्ताधारी मंत्री अशा ठिकाणी जाऊन त्यांच्या अस्तित्वाला मान्यता देत आहेत. हे पोलिस दलाच्या आत्मसन्मानावर थेट आघात करणारे असून अवैध धंदे करणाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासारखे आहे, असा आक्षेप युवक काँग्रेसचे समीर जवंजाळ यांनी घेतला आहे.
कुठलाही हेतु नव्हता तर पालकमंत्री गेले कशाला?शहरात आता एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे - 'पालकमंत्र्यांकडून अशा अवैध धंद्यांना राजाश्रय दिला जात आहे का?' जर हा राजाश्रय नसेल, तर मग जबाबदार पदावरील व्यक्तीने अशा ठिकाणी जाण्याची गरज काय होती? या पबच्या ठिकाणी कोणत्या उद्देशाने भेट देण्यात आली? आणि जर ही भेट समर्थनाचा संकेत असेल, तर प्रशासनाची कठोर कारवाई ही केवळ दिखावाच आहे का, असा सवाल युवक काँग्रेसने उपस्थित केला आहे.