इर्विनच्या लिपिकाला मारहाण; आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरी
By प्रदीप भाकरे | Updated: December 23, 2022 17:45 IST2022-12-23T17:44:20+5:302022-12-23T17:45:01+5:30
आरोपीविरूद्ध शासकीय कामकाजात अडथळा, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा

इर्विनच्या लिपिकाला मारहाण; आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरी
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय ‘इर्विन’मधील लिपिकाला शिविगाळ व मारहाण केल्याप्रकरणी एका आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरी, २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली. प्रकाश बिट्टू इमले (४५, सुदर्शननगर, फ्रेजरपुरा) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी २३ डिसेंबर रोजी हा निर्णय दिला.
विधीसुत्रानुसार, १६ फेब्रुवारी २०१७ रोजी इर्विनमध्ये ही घटना घडली होती. आशिष गोपाळराव रामटेके (३२) हे इर्विनमध्ये कर्तव्यावर असताना आरोपी प्रकाश इमले याने पगारावरून रामटेके यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी आरोपीविरूद्ध शासकीय कामकाजात अडथळा, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तपासाअंती दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सुनावणीदरम्यान, अतिरिक्त सरकारी वकील मंगेश भागवत यांनी तीन साक्षीदार तपासले. यात फिर्यादी, साक्षीदारांची साक्ष व युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार बाबाराव मेश्राम व अरूण हटवार यांनी काम पाहिले. तर, कोर्ट मोहरर विजय आडे यांनी सहकार्य केले.