इर्विनमध्ये तरुणास तलवारीसह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 22:50 IST2018-06-29T22:49:44+5:302018-06-29T22:50:01+5:30
शर्टाच्या मागील भागात तलवार लपून फिरणाऱ्या एका तरुणास इर्विन रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी शुक्रवारी दुपारी पकडले. पोलिसांशी हुज्जत घालून पळून जाण्याचा आरोपी प्रयत्न करीत असल्यामुळे त्याला पोलिसांनी चोप दिला.

इर्विनमध्ये तरुणास तलवारीसह अटक
अमरावती : शर्टाच्या मागील भागात तलवार लपून फिरणाऱ्या एका तरुणास इर्विन रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी शुक्रवारी दुपारी पकडले. पोलिसांशी हुज्जत घालून पळून जाण्याचा आरोपी प्रयत्न करीत असल्यामुळे त्याला पोलिसांनी चोप दिला. याप्रकरणी गौरव शंकर धुर्वे (२८, रा. समाधाननगर) याच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी आर्म्स अॅक्टचा गुन्हा नोंदविला.
पोलिसांशीही अरेरावी
गौरव धुर्वे हा बाह्यरुग्ण कक्षात संशयास्पद स्थितीत फिरत असून, शर्टाच्या मागील भागात त्याने काही तरी लपविल्याचे सुरक्षा रक्षक नदीम पठाण यांच्या लक्षात आले. त्यांनी सहकारी अमोल घोटे यांच्या मदतीने गौरवला पकडले. त्याने तीव्र विरोध केला; मात्र सुरक्षा रक्षकांनी गौरवला इर्विन चौकीतील पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तलवार जप्त करण्याचे प्रयत्न करताच, तो धक्काबुक्की करायला लागला होता. पोलीस कर्मचारी मिलिंद गवई, तुबोकार यांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेची माहिती नियंत्रण कक्षामार्फत कोतवाली पोलिसांना देण्यात आली. काही वेळातच इर्विनमध्ये ताफा दाखल झाला. पोलिसांनी गौरवला ताब्यात घेतले. त्याने मद्यपान केल्याचे पोलिसांना आढळून आले. यावेळी इर्विनमध्ये बघ्यांची गर्दी होती.
‘तो’ आला वचपा काढण्यासाठी
गौरव धुर्वेचा तीन दिवसांपूर्वी अजय कंगाले नामक व्यक्तीशी वाद झाला होता. अजय हा इर्विन रुग्णालयात असल्याची माहिती गौरवला शुक्रवारी मिळाली. त्याच्यावर हल्ला करण्यासाठी बेताने इर्विन रुग्णालयात तलवार घेऊन दाखल झाल्याची माहिती गौरवने कोतवाली पोलिसांनी दिली.