रक्तसंकलनासह अंधत्व नियंत्रणात ‘इर्विन’ अव्वल
By Admin | Updated: November 25, 2015 00:47 IST2015-11-25T00:47:54+5:302015-11-25T00:47:54+5:30
एरवी जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात इर्विनमधील एकंदरीत व्यवस्था टिकेच्या लक्ष्यस्थानी असते.

रक्तसंकलनासह अंधत्व नियंत्रणात ‘इर्विन’ अव्वल
जिल्हा शल्यचिकित्सक प्रथम : शासकीय रुग्णालयांचे मूल्यांकन
अमरावती : एरवी जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात इर्विनमधील एकंदरीत व्यवस्था टिकेच्या लक्ष्यस्थानी असते. सामाजिक आणि राजकीयमधील संघटनांचा पदाधिकारी नेहमी इर्विनच्या नावे खडे फोडतात. अशा सर्वांसाठी इर्विनचे यश तोंडात बोट घालणारे ठरणार आहे. थोड्याथोडक्यात नव्हे ५ ते ६ विभागांमध्ये इर्विनने पहिला व दुसरा क्रमांक पटकावला आहे. इर्विन अर्थात अमरावतीचे सामान्य रुग्णालय आरोग्य सुविधा देण्यास अव्वल ठरले आहे.
इर्विनमधील ब्लड बँकेने अव्वल क्रमांक पटकावला आहे. वर्षभरात २८४ शिबिरांतून १८,५३८ पिशव्या रक्तसंकलन करून या ब्लड बँकेने इतर सर्व जिल्ह्यातील ब्लड बँकांना मागे टाकले. जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीत ११७ रक्तसंकलन शिबिरे घेण्यात आलीत. त्यात ७९२० पिशव्या रक्तसंकलन करून शासकीय रुग्णालयात रक्तपेढीचे पाचव्या क्रमांकावर मूल्यांकन झाले. तसेच १ जानेवारी ते २८ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत १६७ शिबिरे घेण्यात आलीत.
त्यात १०,६०९ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. शासकीय रुग्णालयीन रक्तपेढीमध्ये झालेल्या मूल्यांकनात अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्रथम क्रमांक मिळाला. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये केवळ जिल्ह्यातूनच नव्हे, तर अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, हिंगोली, मराठवाडा आणि नजीकच्या मध्यप्रदेशातूनसुध्दा अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. (प्रतिनिधी)