राजकीय कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपाला ‘इर्विन’चे डॉक्टर वैतागले
By Admin | Updated: February 4, 2016 00:10 IST2016-02-04T00:10:33+5:302016-02-04T00:10:33+5:30
जिल्ह्यातील गोरगरिबांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने येथे सेवा देणारे डॉक्टर वैतागले आहेत.

राजकीय कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपाला ‘इर्विन’चे डॉक्टर वैतागले
अमरावती : जिल्ह्यातील गोरगरिबांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने येथे सेवा देणारे डॉक्टर वैतागले आहेत. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी चालविलेल्या अरेरावीमुळे आरोग्यसेवेवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या इर्विन रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांना उपचारार्थ दाखल केले जाते. त्यामध्ये काही रुग्ण आपात्कालीन स्थितीतसुध्दा येतात. रुग्णालयात रुग्ण दाखल होताच डॉक्टर व परिचारिका तत्काळ उपचार सुरू करतात. मात्र, रुग्णांसोबत राजकीय कार्यकर्ते असल्यास त्यांची अरेरावी डॉक्टरांना सहन करावी लागते. पदाचा, पक्षनेत्याचे नाव सांगून डॉक्टरांवर दबाव आणला जात असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. राजकीय कार्यकर्ते रुग्णांच्या प्रकृतीसंदर्भात विचारपूस करीत आमच्या रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याची ओरड करतात. यासंदर्भात वाद करून मोठमोठ्या आवाजात गोंधळही घालतात. त्यामुळे डॉक्टरांना आरोग्य सेवा पुरविण्यात अडसर निर्माण होत आहे. इर्विन रुग्णालयात रुग्णांचा ओघ सुरु असल्यामुळे दररोज रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ असते. रूग्णांची गंभीर स्थिती लक्षात घेऊन त्यानुसार येथील परिचारिका व डॉक्टर तत्काळ योग्य ती तपासणी करतात. मात्र, तरीही रुग्णांवर योग्य उपचार करीत नसल्याचा ठपका नेहमीच डॉक्टरांवर ठेवण्यात येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबाबत अनेकदा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, याबाबत अद्यापपर्यंत तोडगा निघाला नसल्याचे आढळून आले आहे. राजकीय नेत्यांचा, त्यांच्या कार्यकर्त्यांचा हा वरदहस्त रोखण्याकरिता योग्य ते पाऊल उचलण्याची येथील डॉक्टरांची मागणी आहे.
आम्ही रुग्णांकडे तत्काळ लक्ष देऊन आरोग्य सेवा पुरवितो. मात्र, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते विनाकारण वाद करून रुबाब टाकण्याचा प्रयत्न करतात. अशाप्रकारांमुळे ओपीडीत गोंधळ निर्माण होऊन आरोग्य सेवा पुरविण्यात अडथळा निर्माण होतो.
- उज्ज्वला मोहोड,
वैद्यकीय अधिकारी.
आमच्यासाठी सर्व रुग्ण सारखेच असतात. त्यांना योग्य सेवा पुरविणे आमचे कर्तव्य आहे. मात्र, राजकीय कार्यकर्ते रुबाब दाखवीत दबाव आणतात. आम्हाला ओळखत नाही का, नमस्कार का केला नाही, असेही म्हणतात. त्यांच्या अशा वागणुकीमुळे गोंधळ निर्माण होतो आणि आरोग्य सेवाही विस्कळीत होते.
- सुनीता मेश्राम, वैद्यकीय अधिकारी,