इर्विन रुग्णालयातील एक्सरे मशीनचे प्रिंटर बंद
By उज्वल भालेकर | Updated: April 23, 2023 17:46 IST2023-04-23T17:46:27+5:302023-04-23T17:46:56+5:30
आठ दिवसांपासून रुग्णांना हार्डकॉपी मिळेना, मोबाइलमध्ये घ्यावी लागते छबी

इर्विन रुग्णालयातील एक्सरे मशीनचे प्रिंटर बंद
उज्वल भालेकर, अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील एक्सरे मशीनचे प्रिंटर मागील आठ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना एक्सरे फिल्म (हार्डकॉपी) देणे बंद आहे. त्याऐवजी रुग्णांना आपल्या स्मार्ट फोनमध्ये एक्सरेच्या कॉम्प्युटरवरून फोटो काढून डॉक्टरांना दाखवावा लागत आहे. मोबाइलमधील फोटो अस्पष्ट असल्यास डॉक्टरांनी योग्य निदान करावे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रोज सरासरी १०० ते १२० च्या जवळपास रुग्ण हे एक्स-रे काढण्यासाठी येतात. अपघातग्रस्त रुग्णांचे निदान करण्यासाठी तातडीने एक्स-रे काढणे हे गरजेचे असते. परंतु, येथील एक्स-रे मशीनमध्ये दरमहा येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे ही मशीन महिन्यातील आठ दिवस तर बंदच असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे अनेक वेळा इमर्जन्सी असल्यास रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून एक्स-रे काढून आणण्याची वेळ येते. अशातच आता मागील आठ दिवसांपासून एक्सरे मशीनचे फिल्म प्रिंटर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने रुग्णांना एक्स-रेची हार्डकॉपी देणे बंद आहे. हार्डकॉपीतच अस्पष्ट दिसणारा एक्स-रे अहवाल हा मोबाइलच्या छोट्या स्क्रीनवर कसे काय स्पष्ट दिसेल, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
एक्सरे काढण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून एक्स-रे काढणे सुरू आहे. परंतु, एक्सरेचे फिल्म प्रिंटरमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने रुग्णांना हार्ड कॉपी देणे बंद आहे. यासंदर्भात ज्या कंपनीचे फिल्म प्रिंटर आहे, त्या कंपनीच्या प्रतिनिधींना कळविण्यात आले असून ते लवकरच प्रिंटर सुरू करून देतील. - डॉ. नरेंद्र सोळंके, आरएमओ, इर्विन रुग्णालय
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"