इर्विनमध्ये स्वाईन फ्लूचे १८ पॉझिटिव्ह
By Admin | Updated: March 22, 2015 01:22 IST2015-03-22T01:22:40+5:302015-03-22T01:22:40+5:30
राज्यभरात स्वाईन फ्लूने तोंड काढले असताना इर्विन रुग्णालयात आतापर्यंत एकूण १८ पॉझिटीव्ह व ७७० संशयीत रुग्ण आढळून आलेत.

इर्विनमध्ये स्वाईन फ्लूचे १८ पॉझिटिव्ह
वैभव बाबरेकर अमरावती
राज्यभरात स्वाईन फ्लूने तोंड काढले असताना इर्विन रुग्णालयात आतापर्यंत एकूण १८ पॉझिटीव्ह व ७७० संशयीत रुग्ण आढळून आलेत. रुग्णांना वेळेवर उपचार मिळाल्याने सर्व रुग्ण बरे होऊ शकलेत. स्वाईन फ्लूने इर्विनमध्ये एकही रुग्ण दगावला नाही.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून स्वाईन फ्लूचा प्रसार वाढल्याचे निदर्शनास आले होते. तेव्हापासून आरोग्य विभागाने विविध उपाययोजना सुरु केल्या होत्या. विविध माध्यमांतून जनजागृती करुन सर्व आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला होता. अमरावती जिल्ह्यातील सहा रुग्णांनी नागपूर येथील रुग्णालयांत प्राण सोडले. अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना वाचविण्यात इर्विन प्रशासनाला यश आले. इर्विनमध्ये आतापर्यंत सर्दी, खोकला व ताप अशा लक्षणांच्या २ हजार ११६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ७७० रुग्णांवर टॅमी फ्लूचा उपचार करण्यात आला.
७५ रुग्णांच्या 'थ्रोट स्वॅब' नमुन्यांची नागपूरच्या प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आल्यावर त्यामध्ये १८ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेत. तसेच १४९ रुग्णांना इर्विनमध्ये दाखल करवून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखभालीत उपचार करण्यात आले.
या रुग्णांकडे आरोग्य विभागाने विशेष लक्ष केंद्रीत करुन उपाय योजना केल्यात. बराचश्या रुग्णांचे आजार पूर्णपणे बरे झाले आहेत. इलाज सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती प्रकृती धोक्याबाहेर आहे.