अमरावती तालुक्यात रखडल्या सिंचन विहिरी
By Admin | Updated: March 23, 2015 00:31 IST2015-03-23T00:31:55+5:302015-03-23T00:31:55+5:30
जिल्ह्यात धडक सिंचन विहिरीच्या ६९२ मंजूर विहिरींपैकी आतापर्यंत केवळ १४१ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

अमरावती तालुक्यात रखडल्या सिंचन विहिरी
अमरावती : जिल्ह्यात धडक सिंचन विहिरीच्या ६९२ मंजूर विहिरींपैकी आतापर्यंत केवळ १४१ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये तालुकानिहाय उद्दिष्टांमध्ये सर्वाधिक विहिरींची कामे नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यात ४१ विहिरींपैकी ३३ विहिरींची कामे पूर्ण केली आहेत. अमरावती तालुक्यात ६८ मंजूर विहिरींपैकी केवळ एकच विहीर पूर्ण झाली आहे. त्यामुळे विहिरींच्या कामात हा तालका माघारल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
जिल्ह्याला धडक सिंचन विहीर योजनेअंतर्गत १३ तालुक्यांसाठी ६८२ विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. यापैकी अद्यापपर्यंत १४१ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. ५४१ विहिरींचे कामे प्रगतिपथावर आहेत. आतापर्यंत या विहिरींच्या कामावर सुमारे १ कोटी ९१ लाख २५ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. राज्य शासनाने राबविलेल्या धडक सिंचन विहीर योजनेअंतर्गत जिल्ह्यात राबविलेल्या धडक सिंचन विहीर योजनेअंतर्गत सर्वाधिक १३३ विहिरी धामनगाव रेल्वे तालुक्यात मंजूर आहेत.यापैकी ३३ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. १०० विहिरींची कामे प्रगतीपथावर असल्याचे अहवालात नमूद केले आहे.अमरावती तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामाची जबाबदारी असलेल्या २० मंजूर विहिरींना अद्यापही मुहूर्त गवसला नाही.याशिवाय जि. प. बांधकाम विभागाकडे मंजूर असलेल्या ४८ विहिरींपैकी केवळ एकच विहीर पूर्ण झाली असून ४७ विहिरींचे कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
चांदूररेल्वे तालुक्यात १०१ विहिरी मंजूर आहेत. त्यापैकी ६५ विहिरीची कामे पूर्ण झाली आहेत. ३६ विहिरींची कामे सुरू आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मंजूर विहिरींपैकी ३३ विहिरींची कामे पूर्ण झाली तर आठ विहिरींची कामे सुरू आहेत. या तालुक्यातील विहिरीची कामे करण्याची जबाबदारी लघु पाटबंधारे विभागाकडे आहे. या यंत्रणेने बऱ्यापैकी कामात आघाडी घेतल्याचे माहिती अहवाला वरून दिसून येते. धडक ंिसंचन विहीर योजनेत अमरावती आणि धारणी तालुक्यांची प्रगती खूपच कमी आहे. त्यामुळे सिंचन विहिरींच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)