विद्यार्थिनीला मारहाण प्रकरणाची चौकशी पूर्णत्वाकडे
By Admin | Updated: September 15, 2015 00:14 IST2015-09-15T00:14:51+5:302015-09-15T00:14:51+5:30
मागील १५ दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला भर रस्त्यात महिला पोलीस उपनिरीक्षकाने कानशिलात लगावली होती.

विद्यार्थिनीला मारहाण प्रकरणाची चौकशी पूर्णत्वाकडे
जबाब नोंदविले : पीएसआयवर कारवाईची टांगती तलवार, सीसीटीव्ही फुटेजच्या स्लीपही जोडल्या
सुनील देशपांडे अचलपूर
मागील १५ दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला भर रस्त्यात महिला पोलीस उपनिरीक्षकाने कानशिलात लगावली होती. या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण झाली असून त्याचा अहवाल येत्या दोन-तीन दिवसांत जिल्हा पोलीस अधीक्षकांसमोर ठेवला जाणार असल्याची माहिती आहे. सदर 'थप्पड मार' प्रकरणाला 'लोकमत'ने वाचा फोडली होती. या प्रकरणाकडे अचलपूर-परतवाड्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हे प्रकरण आपसात मिटविण्यासाठी काही पोलीस अधिकारी प्रयत्नशील असल्याची चर्चा जनतेत आहे.
अचलपूर येथील जगदंब महाविद्यालयात विज्ञान शाखेत तृतीय वर्षाला शिकत असलेली विद्यार्थिनी २८ आॅगस्ट रोजी शुक्रवारी सायंकाळी तिच्या आत्यासोबत स्कुटीने चावलमंडी या वर्दळीच्या रस्त्यात गेली व तिच्या रस्त्याच्या बाजूला गाडी लावलेली होती. तेवढ्यात महिला पोलीस उपनिरीक्षक पद्मशिला तिरपुडे यांनी तेथे येऊन तिला वाहन परवाना मागितला व काही कारण नसताना तिच्या कानशिलात थप्पड लगावली होती. या प्रकरणाचे पडसाद जुळ्या शहरात उमटले होते. स्नेहलने महिला पोलीस उपनिरीक्षकाची लेखी तक्रार दुसऱ्या दिवशी २९ आॅगस्ट रोजी आपले वकील व्ही.आर. घाटे ह्यांना सोबत घेऊन पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्याकडे केली. तसेच 'लोकमत'ने ३१ आॅगस्ट व १ सप्टेंबर रोजी याबाबत सविस्तर वृत्त दिले होते.
या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जि.पो. अ. (ग्रामीण) गौतम ह्यांनी दिले होते. या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर कदम व त्यांचे सहाय्यक वसंत करई यांचेकडे होती. चौकशीत स्नेहल रोडगे, हिच्या सह ज्यांनी प्रत्यक्ष घटना बघितली ते गजानन सालकूटे, शरद काकडे तिची आत्या बेबीताई डहाके (६६) तसेच मनीष खंडेलेवाल, मुंगाशेट व तिचे वडील गजाननराव रोडगे इत्यादींचे जवाब नोंदविण्यात आले आहेत. या जबाबासोबत सीसीटीव्ही कॅमेरातील फूटेजची स्लीपही जोडण्यात आली आहे. पीएसआय तिरपुडे यांनी अरेरावी करुन स्नेहलला केलेल्या मारहाणप्रकरणी नरेंद्र फिसके, माजी सरपंच दिलीप राऊत, प्रहारचे सतीश आकोलकर, भाजपाचे शहर उपाध्यक्ष श्रीधर क्षीरसागर, माधुरी शिंगणे उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे.
मला भर रस्त्यात पीएसआय तिरपुडे यांनी माझ्या कानशिलात मारून अपमानित करण्याची घटना मी विसरू शकत नाही. महिलांना आपल्या राज्यात अशाच प्रकारचे संरक्षण आहे का, असा प्रश्न मी मुख्यमंत्री देवेंद्रकाकांना (फडणवीस) पत्र पाठवून विचारणार आहे. म्हणजे कुठल्याही विद्यार्थिनीला पोलीस विनाकारण मारहाण करण्याची हिम्मत करणार नाही. तसेच मला या प्रकरणात 'लोकमत'ने खरा आधार देऊन न्यायासाठी माझ्या प्रकरणाला वाचा फोडली, यात शंकाच नाही.
- स्नेहल रोडगे ,
विद्यार्थिनी, जगदंब महाविद्यालय.
या प्रकरणाबद्दल न्यायालयात भादंविच्या कलम ३२३ प्रमाणे दावा टाकण्याची आमची प्राथमिक तयारी पूर्ण झाली. पीएसआय तिरपुडे यांनी कायदा हातात घेऊन स्नेहलच्या कानशिलात लगावली. तेही भर रस्त्यात अपमानित केले, हे गैर कायदेशीर आहे. याचा फौजदारी दावा दाखल करून न्यायालयातही दाद मागणार आहे.
- व्ही.आर. घाटे,
स्नेहलचे वकील.