अद्याप चौकशी समितीपुढे आलेच नाही ‘त्या’ चार संकुलांचे रेकॉर्ड !
By Admin | Updated: July 6, 2015 00:09 IST2015-07-06T00:09:34+5:302015-07-06T00:09:34+5:30
महापालिकेच्या चार संकुलांमध्ये नियमबाह्य प्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी,

अद्याप चौकशी समितीपुढे आलेच नाही ‘त्या’ चार संकुलांचे रेकॉर्ड !
आयुक्तांच्या आदेशाला खो : फौजदारी कारवाईची प्रक्रिया लांबणीवर
अमरावती : महापालिकेच्या चार संकुलांमध्ये नियमबाह्य प्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आयुक्तांनी चौकशी समिती नेमण्याचे ठरविले. मात्र, चौकशी समितीपुढे या संकुलाचे रेकॉर्डच पोहोचले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे दोषींविरुद्ध फौजदारी दाखल करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडत आहे.
येथील तहसीलनजीकचे खत्री कॉम्प्लेक्स, राजकमल चौकातील दादासाहेब खापर्डे संकुल, खत्री कॉम्प्लेक्स तर जयस्तंभ चौकातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी संकुलात मोठे गौडबंगाल झाल्याची बाब मे महिन्यात उघडकीस आली. या गंभीर प्रकाराने आयुक्त चंद्रकांत गुडेवार अवाक् झाले होते. हे चारही संकुल बीओटी तत्त्वावर साकारण्यात आले आहेत. काही संकुलांचा करारनामा २०१८ मध्ये संपुष्टात येणार आहे. या संकुलात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजार परवाना विभागाचे तत्कालीन अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी परस्पर करारनामे करुन प्रशासनाची फसवणूक तर केलीच; परंतु संकुलधारकांची आर्थिक लूट केल्याची चर्चासुद्धा होती. त्यामुळे गंगाप्रसाद जयस्वाल यांची प्रथम चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे निर्देश आयुक्त गुडेवार यांनी दिले होते. त्यानुसार उपायुक्त चंदन पाटील यांच्या मार्गदर्शनात बाजार परवाना विभागाच्या चमूने या चारही संकुलांची पाहणी करुन व्यापाऱ्यांकडून कागदपत्रांची मागणी केली आहे. प्रथमदर्शनी संकुलातील गाळेधारकांसोबत परस्पर करारनामे करण्यात आल्याचे या चमुच्या निदर्शनास आले. इतकेच नव्हे, तर बाजार परवाना विभागाने वसूल केलेला करही रेकॉर्डवर नसल्याचे वास्तव आहे. गंगाप्रसाद जयस्वाल यांनी गाळेधारकांशी परस्पर करारनामे करुन लाखो रुपयांची फसवणूक केली. आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी उपायुक्त चंदन पाटील व सहायक आयुक्त राहुल ओगले यांच्यावर सोपविली आहे. परंतु महिनाभराचा कालावधी लोटल्यानंतरही चौकशी समितीपुढे चारही संकुलांचा रेकॉर्ड आणला गेला नाही. त्यामुळे चौकशी कशी? कोणी करावी? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
चार संकुलांत गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. यात बदमाशी करणाऱ्यांना कारागृहाची हवा खावीच लागेल. त्याकरिता द्विसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. पुढे काय झाले, याचा शोध घेतला जाईल. याप्रकरणी गंगाप्रसाद जयस्वाल दोषी आहेतच.
- चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका.