भाईचंद हिराचंद पतसंस्थेची चौकशी
By Admin | Updated: September 29, 2014 00:32 IST2014-09-29T00:32:53+5:302014-09-29T00:32:53+5:30
शेकडो गुंतवणूकदार आपली जमा रक्कम परत घेण्यास स्थानिक पानअटाई भागातील भाईचंद हिराचंद पतसंस्थेत दोन महिन्यांपासून पायपीट करीत आहेत. पण पतसंस्थेच्या कार्यालयाला

भाईचंद हिराचंद पतसंस्थेची चौकशी
पतसंस्थेला टाळे : गुंतवणूकदारांची फसवणुकीची तक्रार
अंजनगाव सुर्जी : शेकडो गुंतवणूकदार आपली जमा रक्कम परत घेण्यास स्थानिक पानअटाई भागातील भाईचंद हिराचंद पतसंस्थेत दोन महिन्यांपासून पायपीट करीत आहेत. पण पतसंस्थेच्या कार्यालयाला लागलेले टाळे उघडले नाही. हताश झालेल्या काही ठेवीदारांनी अखेर स्थानिक पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली. तक्रार करणाऱ्यांमध्ये नगरसेवक नीलेश पसारी, उज्ज्वला टांक, गजानन चांदूरकर, राजेन्द्र झाडे, उमेश भोंडे, दीपक शेजे, मारोती पायघन, महादेव भावे, रघुनाथ आरोकार, सोनाली डिके आदींचा समावेश आहे.
ठेवीदारांनी केलेली ही तक्रार सध्या पोलीस चौकशीत असून याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पण तक्रारीचे गांभीर्य जाणून घेण्यासाठी या पतसंस्थेचे स्थानिक व्यवस्थापक राहुल कडू यांची पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांनी पतसंस्थेच्या कार्यालयाची झडती घेऊन महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत. यासंदर्भाचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आला. मात्र पतसंस्थेच्या कार्यालयात ठेवीदारांचा एक रुपयादेखील सापडला नाही. सर्व रक्कम सुर्जीच्या आके बँकेमार्फत जळगाव येथील पतसंस्थेच्या कार्यालयात पाठविण्यात आल्याचे समजते.
गुंतवणूकदारांनी पोलीस तक्रारीत नमूद केल्यानुसार पतसंस्थेच्या संचालकांनी उद्घाटनाच्या दिवशी गावात फिरुन रक्कम गोळा केली. मात्र ज्यावेळी ठेवीदारांना गरज पडली त्यावेळी रक्कम परत करण्यास संचालक असमर्थ ठरले. पतसंस्थेत कोणत्याच कर्मचाऱ्यांकडे अधिकृत नियुक्ती पत्र नसल्याची गंभीर बाबही तपासात पुढे आली. अंजनगावात बंद पडलेल्या या पतसंस्थेचे जळगाव येथील कार्यालय मात्र एखाद्या कार्पोरेट कंपनी कार्यालयालाही लाजवेल एवढे आलिशान आहे.
ठाणेदार गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नितीन चव्हाण हे या प्रकरणाची तपासणी करीत आहेत. जे संचालक मंडळ पतसंस्थेने नियुक्त केले होते त्यामधील बहुतांश संचालकांनादेखील गुंतवणुकीत आर्थिक फटका बसला. या सर्वांना प्रवृत्त करणारा आणि अंजनगावात पतसंस्था स्थापन करणाऱ्या मध्यस्थींचाही शोध सुरू आहे.